कपिलधार : शिवा संघटनेचा 30वा राज्यव्यापी मेळावा आणि संतशिरोमणी मन्मथ स्वामींची 24वी शासकीय महापूजा हा ऐतिहासिक सोहळा कपिलधार येथे मोठ्या उत्साहात आणि दिव्य वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि देशभरातून लाखो भाविकांनी या मेळाव्यास हजेरी लावली.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा. ना. बाबासाहेब पाटील, शिवा संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर, सौ. अर्चना पाटील चाकुरकर, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, तसेच अनेक धार्मिक गुरुवर्य व मान्यवर उपस्थित होते.या मेळाव्यात प्रा. मनोहर धोंडे सरांनी शिवा संघटनेच्या तीन दशकांच्या संघर्षमय वाटचालीचा आढावा घेतला.त्यांनी नमूद केले की “वीरशैव-लिंगायत समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक विकासासाठी आम्ही केलेल्या संघर्षामुळेच आज समाजाला न्याय आणि मान्यता मिळाली आहे. अनेक प्रश्न सोडवण्यात शिवा संघटनेने निर्णायक भूमिका बजावली आहे.”
प्रा. धोंडे सरांच्या नेतृत्वात वीरशैव-लिंगायत समाजातील 25 जातींना OBC आरक्षणात समावेश करून दिला गेला. या आरक्षणामुळे समाजातील हजारो तरुणांना शासकीय नोकरी, शिक्षण, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नेतृत्वाची संधी मिळाली. “आज आपल्या समाजातील अनेक युवक एमबीबीएस, अभियांत्रिकी, प्रशासन सेवांमध्ये पोहोचलेत; हा आरक्षणाचा आणि शिवा संघटनेच्या सातत्यपूर्ण लढ्यांचा परिणाम आहे,” असेही त्यांनी सांगितले. शिवा संघटनेच्या पाठपुराव्यामुळे कपिलधार, सोलापूरचे सिद्धेश्वर, धारेश्वर अशा अनेक धार्मिक स्थळांना तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाला.
या माध्यमातून त्या त्या ठिकाणी कोट्यवधींची विकासकामे मंजूर होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला नवा वेग मिळाला आहे. तसेच, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून समाजातील गरजू युवकांना स्वावलंबनाची नवी दिशा देण्यात आली. मेळाव्यात बोलताना प्रा. धोंडे सरांनी जाहीर केले की, “लवकरच दिल्लीच्या जंतरमंतर येथे ‘बसवकल्याण येथील मूळ अनुभव मंटप आणि पुरुष कट्टा हैद्राबादच्या नवाबांच्या ताब्यातून मुक्त करा’ या मागणीसाठी भव्य आणि ऐतिहासिक आंदोलन उभारले जाणार आहे.”या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जयघोष करत सभा गाजवली.
मेळाव्यावेळी समाजाच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘शिवा महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारांचे वितरण सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या पुरस्कार समारंभामुळे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामाची कौतुक मोठ्या व्यासपीठावर झाल्याचा आनंद अनेकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच शिवा संघटनेची वाटचाल आणि संबंधित कार्यक्रमाची भूमिका यासंदर्भातउमाकांत आप्पा शेटे, दत्ताभाऊ खंकरे आणि अभयजी कल्लावार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सुत्रसंचालनाची जबाबदारी संजय कोठाळे व रुपेश होनराव यांनी समर्थपणे पार पाडली.विचारपीठावर राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, शिवा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष विठ्ठलराव ताकबिडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
-------------------------------------------------------------------------------------------------


