पोलिस स्टेशनमध्ये जप्त स्फोटक नमुने तपासताना भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू आणि ३० जखमी


श्रीनगर :  नौगाम पोलिस स्टेशन परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा मोठा स्फोट होऊन गंभीर दुर्घटना घडली. फरीदाबादमध्ये जप्त करण्यात आलेल्या स्फोटक पदार्थांचे नमुने घेत असताना हा अपघाती स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भयानक स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. स्फोट इतका तीव्र होता की पोलिस स्टेशनमधून धूर आणि ज्वाळा उंच उसळताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. जखमी पोलिस अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना तातडीने शहरातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. नुकत्याच नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारस्फोटाच्या काही दिवसांतच काश्मीरमध्ये झालेल्या या घटनेमुळे चिंता वाढली आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉक्टर मुझम्मिल गनई यांच्या भाड्याच्या घरातून जप्त झालेल्या ३६० किलो स्फोटकांपैकी काही साहित्य तपासासाठी नौगाम पोलिस ठाण्यात आणले होते. नमुने काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान अचानक मोठा स्फोट झाला आणि परिसरात भीषण नुकसान झाले. घटनास्थळावरून सहा मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह श्रीनगरमधील पोलिस नियंत्रण कक्षात हलवण्यात आले आहेत.

दुर्घटनेनंतर तपासासाठी सुरक्षा दल, बॉम्बशोधक पथके आणि स्निफर डॉग्ज घटनास्थळी पोहोचले. श्रीनगरचे उपायुक्त अक्षय लाब्रू यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांत किमान २४ पोलिस कर्मचारी आणि तीन नागरिकांना दाखल करण्यात आले आहे. स्फोटामुळे पोलिस स्टेशनच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले असून परिसरातील काही भागात सलग किरकोळ स्फोटांचे आवाजही ऐकू आल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेमुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


-----------------------------------------------------------------------------------------------------------




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने