नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू;

 

2जाणून घ्या आयोगाचे महत्त्वाचे मुद्दे आणि पूर्ण वेळापत्रक

मुंबई :  राज्यात गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

या घोषणेसोबतच राज्यभरात आचारसंहिता लागू झाली असून, 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्या आणि इतर स्थानिक संस्था प्रलंबित असल्या तरी, पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येतील.

निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत 

राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींसाठी एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदान करणार आहेत. यासाठी 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुका EVM यंत्रांद्वारे घेण्यात येणार आहेत, मात्र या निवडणुकीत VVPAT प्रणालीचा वापर होणार नाही

नगरपरिषदांच्या सदस्यसंख्येनुसार खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली असून, नगराध्यक्षपदासाठी 15 लाख आणि सदस्यांसाठी 7 लाख रुपये इतकी मर्यादा राहील. तसेच, दुबार मतदारांवर कारवाई करण्यासाठी आयोगाने कडक पावले उचलली आहेत. अशा मतदारांच्या नावासमोर डबल स्टार () चिन्ह दिसेल आणि त्यांना आपले नाव निश्चित करण्यासाठी डिक्लेरेशन द्यावे लागेल.

मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाने नवीन मोबाइल  ॲप सुरू केले आहे, ज्याद्वारे मतदारांना आपले नाव, मतदान केंद्र आणि इतर तपशील डिजिटल पद्धतीने पाहता येतील. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राज्यभरात 32 जनजागृती कॅम्पेन सुरू करण्यात आली आहेत. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तसेच बाळासह महिलांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल. काही केंद्रे ‘गुलाबी मतदान केंद्र’ (Pink Booths) म्हणून ओळखली जातील, जिथे सर्व अधिकारी आणि पोलिस महिला असतील.

आचारसंहिता लागू झाल्याने संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात कोणतेही नवीन धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. मात्र, नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्कालीन मदत यासंबंधीच्या उपाययोजनांवर आचारसंहितेचा अडथळा राहणार नाही.

दिव्यांग, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हिलचेअर, रॅम्प, पिण्याचे पाणी, सावली, शौचालय आदी मूलभूत सुविधा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. महिला मतदारसंख्या अधिक असलेल्या ठिकाणी सर्व महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांसह केंद्र स्थापन केले जाईल. मतदान केंद्राच्या आत मोबाईल नेण्यास बंदी असेल, मात्र बाहेर मोबाईल जमा करण्यासाठी विशेष कक्ष असतील.

या निवडणुकांसाठी 288 निवडणूक निर्णय अधिकारी, 288 सहाय्यक अधिकारी आणि सुमारे 66,775 निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. महसूल विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक मनुष्यबळासाठी आदेश दिले गेले आहेत.


 Maharashtra Local Body Elections 2025 – संपूर्ण वेळापत्रक:

नामनिर्देशन पत्र दाखल: 10 नोव्हेंबर

अंतिम मुदत: 17 नोव्हेंबर

छाननी: 18 नोव्हेंबर

अर्ज वापस घेण्याची तारीख: 21 नोव्हेंबर

निवडणूक चिन्ह वाटप: 26 नोव्हेंबर

मतदान: 2 डिसेंबर

निकाल: 3 डिसेंबर

विभागनिहाय निवडणुकांची संख्या:

कोकण – 27

नाशिक – 49

पुणे – 60

संभाजीनगर – 52

अमरावती – 45

नागपूर – 55

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका केवळ प्रशासनिक घडामोडी नाहीत, तर राजकीय पातळीवरही प्रचंड महत्त्वाच्या ठरणार आहेत. चार वर्षांनंतर राज्यातील राजकीय पक्षांची ताकद तपासली जाणार असून, ही निवडणूक आगामी विधानसभा समीकरणांवरही प्रभाव टाकणारी ठरू शकते.


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने