Bhondu Baba Fraud : श्रद्धेच्या नावाखाली आयुष्यभराची कमाई लुटली! ‘शंकर महाराज अंगात येतात’ असा दावा करत पुण्यातील सुशिक्षित कुटुंबाची फसवणूक आरोपींनी पुण्यात आलीशान बंगला खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे
पुणे: अंधश्रद्धा आणि लोभाच्या संगमातून पुन्हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयटी इंजिनिअर दीपक डोळस आणि त्यांची शिक्षक पत्नी यांना भोंदू बाबा आणि त्याच्या शिष्येने तब्बल १४ कोटी रुपयांना फसवलं. “शंकर महाराज अंगात येतात” असा दावा करत या दांपत्याला इंग्लंडमधील घर, फार्महाऊस आणि पुण्यातील मालमत्ता विकायला भाग पाडण्यात आलं.
या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपुरकर असून, दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१८ पासून सुरू असलेल्या या फसवणुकीत आरोपींनी “तुमच्या मुलींच्या आजारावर शंकर महाराज उपाय सांगतील” असा दावा केला. त्यानंतर वेदिका पंढरपुरकर ही “माझ्या अंगात महाराज येतात” असं सांगून पीडितांना भ्रामक विधाने करत राहिली.
“तुमच्याकडे संपत्ती ठेवली तर संकटं येतील, ती महाराजांच्या आज्ञेने विकावी लागेल” असं सांगून डोळस दांपत्याचे सर्व बँक ठेवी, मालमत्ता, इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस विकून पैसे त्यांच्या खात्यात वळवले गेले.
संपत्ती विकल्यानंतरही मुलींची तब्येत सुधारली नाही. डोळस दांपत्याने विचारणा केली असता, “तुमच्या घरात दोष आहे” असा बहाणा करून आरोपींनी आणखी फसवणूक सुरू ठेवली. ते घर विकायला सांगितलं गेलं, आणि शेवटी राहण्यासाठी उरलेलं एकमेव घर तारण ठेऊन लोन काढायला लावलं.
त्यातून मिळालेल्या पैशांतून दीपक खडके आणि वेदिका पंढरपुरकर यांनी कोथरुडमधील महात्मा सोसायटीत “आकाशदीप” नावाचा आलीशान बंगला खरेदी केला, असा तपासात खुलासा झाला आहे.
हा प्रकार फक्त श्रद्धेच्या आडून झालेली फसवणूक नाही, तर संघटित गुन्हेगारी नेटवर्कचा नमुना असल्याचा संशय पोलिस तपासात व्यक्त केला जात आहे. आरोपींनी आधुनिक तंत्रज्ञान, RTGS व्यवहार आणि मनोवैज्ञानिक दबाव वापरून शिक्षित कुटुंबाची मती गुंग केली. पुण्यासारख्या सुशिक्षित शहरातही अंधश्रद्धेच्या नावाखाली करोडो रुपयांची फसवणूक होतेय, ही धोक्याची घंटा आहे. श्रद्धा आणि फसवणूक यांच्यातील सीमारेषा पुसली गेली तर ‘भोंदू बाबा’ पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतील त्यामुळे सावध राहायला हवे असे संदेश या घटनेने दिला आहे.
