महात्मा फुले योजनेतून गंभीर आजारांवर 10 लाखांपर्यंत मोफत उपचार, मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय

 

मुंबई : राज्यातील रुग्णांसाठी आजची कॅबिनेट बैठक महत्त्वाचे ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य क्षेत्रासह शिक्षण, शेती आणि प्रशासनाशी संबंधित तब्बल 21 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आता गंभीर आजारांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार, योजनेअंतर्गत २,४०० आजारांना कव्हरेज मिळेल. यापैकी २,३९९ आजारांसाठी ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार तर गंभीर व खर्चिक आजारांसाठी १० लाख रुपयांपर्यंतच्या मदतीला मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना दिलासा मिळणार असून, रुग्णालयांना वाढत्या उपचार खर्चासाठी दिलासा मिळेल. शासनाच्या या पावलामुळे रुग्णालयांच्या मागण्या पूर्ण होतील आणि रुग्णांसाठी उपचारांचा दरवाजा अधिक खुला होईल, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

बैठकीत काही मुद्द्यांवरून चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती समोर येत आहे. अनेक मंत्र्यांनी अजूनही शेतकऱ्यांना मदत पोहोचत नसल्याबद्दल प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. कोकणासह मराठवाड्यातील पिकांचे नुकसान लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला त्वरित मदत देण्याचे आदेश दिले. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी पीकविमा व मदत वितरणातील विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित पदांवर समायोजित करण्यास मंजुरी. १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळचा लाभ मिळणार. ग्रामविकास विभागामार्फत भरायच्या आरोग्यसेवेतील रिक्त पदांवर भरती करण्यासही मान्यता.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ३०० प्रवेशक्षमतेचे नवीन शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) सुरू होणार. या संस्थेसाठी ३९ शिक्षक आणि ४२ शिक्षकेतर पदांना मंजुरी. शिक्षणाच्या दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यास हिरवा कंदील.

वर्धा शहरातील रामनगर येथील भाडेपट्टी भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यास मंजुरी. श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांना मंजुरी, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळणार.

बारामतीतील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापकांची ५ पदे निर्माण करण्याचा निर्णय.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “आरोग्य आणि शिक्षण ही सरकारची प्राथमिकता आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील दुप्पट मदतीमुळे लाखो रुग्णांना नवा जीवदान मिळेल.”






Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने