आता 100% खात्री पटली निवडणूक आयोग स्वायत्त

 आहे हे फक्त संविधानातच ! राज ठाकरे संतापले !!

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Election) कार्यक्रम जाहीर केला असून, राज्यात २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पत्रकार परिषदेत दुबार मतदार नोंदणी आणि मतदार याद्यांतील गोंधळावर पत्रकारांनी मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांना प्रश्न विचारले. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

यावर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त  केली आहे.

“निवडणुका आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानातच!”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.

त्यांनी म्हटलं की, “निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनलं आहे. दुबार मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील घोळांवर जर आयोगाला उत्तर द्यायची इच्छाच नसेल, तर मग त्यांचा उपयोग काय? जबाबदारी झटकली आणि उत्तरदायित्वही नाही मग अशा पदांचा काय उपयोग?”

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला ही पत्रकार परिषद पाहण्याचं आवाहन केलं आहे. “ती पाहिली की तुमच्या मतदानाचा अपमान कुठून सुरू होतो हे समजेल,” असं ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी कठोर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांचं अभिनंदनही केलं.

राज ठाकरेंनी भाषणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे ‘सुलभ शौचालय किंवा आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर शेकडो मतदारांची नावं नोंदवली गेली आहेत’ हा होता. त्यावर आयुक्त वाघमारे यांनी उत्तर दिलं की, “मतदार यादी तयार करण्याची यंत्रणा वेगळी आहे. आम्ही ती यादी वापरतो. काही लहान-सहान दोष असतील तर ते दुरुस्त करतो.”मात्र हे उत्तर अपुरं असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रश्न उपस्थित केला “दुबार मतदार कसा थांबवणार? ही पारदर्शक निवडणूक कशी होणार? हे लोकशाहीला घातक आहे.” तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले  “जर निवडणूक आयुक्तच विधानसभेतील दुबार मतदारांवर कमेंट करणार नाही म्हणत असतील, तर जबाबदारी कोण घेणार? मात्र त्यांनी हा मुद्दा मान्य केला हेही एक समाधान आहे.”





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने