नुकसान पाहणीचा 'फार्स', केंद्रीय पथकाचा अंधारात बॅटरीच्या उजेडात पाहणीचा 'दिखावा' शेतकऱ्याची चेष्टा

 

सोलापूर व : अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात (Solapur Flood) मोठ्या प्रमाणावर शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक (Central Team) अखेर सोलापुरात दाखल झालं. पण पाहणीचा वेळ मात्र चर्चेचा विषय ठरला कारण हे पथक रात्रीच्या अंधारात, टॉर्चच्या उजेडात नुकसान पाहणी करताना दिसलं

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनेची थट्टा झाल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. मराठवाडा आणि आसपासच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. केंद्राचे चार सदस्यीय पथक  अवर सचिव अभिषेक कुमार (ग्रामविकास विभाग),

उपसंचालक करण सरीन (ऊर्जा विभाग),

उपसचिव कंदर्फ पटेल (वित्त विभाग) आणि

संचालक सत्येंद्र प्रताप सिंग (जलशक्ती विभाग) —

मोहोळ तालुक्यातील कोळेगावात पाहणीसाठी आले.

मात्र त्यांनी रात्रीच्या अंधारात, बॅटरी आणि टॉर्चच्या उजेडात नुकसान पाहिलं. सकाळचीही वाट न पाहणाऱ्या या पथकाने पाहणी घाईघाईने उरकली, अशी चर्चा शेतकरीवर्गात आहे.

या पथकासोबत आलेल्या कर्मचाऱ्यांनी हात उंचावत टॉर्चच्या उजेडात शेतीकडे नजर टाकली. जवळ उभे असलेले शेतकरी सांगतात की, अधिकारी नुकसान पाहत होते की फक्त ‘पाहिल्याचं नाटक’ करत होते हे समजत नव्हतं.

शेतकऱ्यांनी “अंधारात पाहणी झाली, पण आमच्या आयुष्यातला अंधार कोण घालवणार?” असा सवाल केला आहे.

पूरस्थितीला महिना उलटला, पण पाहणीसाठी केंद्राचं पथक आता आलं. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, कारण मदतीचा ठावठिकाणा नव्हता. पाहणी दरम्यान पथकाने काही शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांनी आपलं दु:ख मांडलं 

कुटुंब, पिकं, घरं आणि उपजीविकेचा आधार सगळं वाहून गेलं असल्याचं सांगितलं. पथकाने त्यांच्या कथा ऐकल्या, पण प्रत्यक्ष मदतीबाबत काहीही स्पष्ट आश्वासन दिलं नाही.

केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल घेतला.

पूरामुळे बाधित गावांची यादी, शेतीचे नुकसान, आणि प्राथमिक अंदाजित आर्थिक हानी याबाबत सविस्तर माहिती मिळवली.

मात्र पाहणीचा वेळ आणि अंधारात केलेला दौरा हा प्रशासनाच्या ‘दिखावूपणाचा’ नमुना असल्याचं शेतकरी म्हणत आहेत.

पूरस्थितीची पाहणी इतक्या उशिरा आणि अशा पद्धतीने का झाली, हा प्रश्न सर्वत्र विचारला जातोय. स्थानिक शेतकरी म्हणतात  “अतिवृष्टीने आम्ही उद्ध्वस्त झालो. पाहणीचं नाटक करून काय उपयोग? आम्हाला प्रत्यक्ष मदत हवी आहे.”






Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने