मुंबई : आज गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने देशातील प्रमुख शेअर बाजारांवर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) — व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत. स्टॉक मार्केट हॉलिडे कॅलेंडरनुसार, 5 नोव्हेंबर (बुधवार) हा दिवस अधिकृत सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे आज इक्विटी, डेरिव्हेटिव्ह, सिक्युरिटीज लेंडिंग आणि करंसी डेरिव्हेटिव्ह या सर्वच विभागांमध्ये ट्रेडिंग होणार नाही.बाजार आता गुरुवारी (6 नोव्हेंबर) नियमित वेळेत उघडतील.
शेअर बाजारांप्रमाणेच कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वरही सकाळच्या सत्रात व्यवहार बंद राहतील. मात्र, सायंकाळी सत्रात (Evening Session) नियमित ट्रेडिंग सुरू राहील.
सप्ताहातील पाच दिवस शेअर बाजार उघडे असतात, तर शनिवार आणि रविवार हे नियमित साप्ताहिक सुट्टीचे दिवस असतात. याशिवाय वर्षभरातील विविध सण आणि राष्ट्रीय सुट्ट्यांसाठी BSE आणि NSE हॉलिडे लिस्ट मध्ये वेळोवेळी विशेष सुट्ट्या जाहीर केल्या जातात.
NSE च्या 2025 हॉलिडे कॅलेंडरनुसार, या वर्षी एकूण 14 स्टॉक मार्केट सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या.
त्यापैकी आजच्या गुरुनानक जयंतीच्या सुट्टीसह 13 सुट्ट्या संपल्या आहेत. आता या वर्षात फक्त एकच सुट्टी शिल्लक आहे 25 डिसेंबर, ख्रिसमस डे. त्या दिवशी बीएसई आणि एनएसई दोन्ही ठिकाणी ट्रेडिंग बंद राहील.
त्याआधीच्या ऑक्टोबर महिन्यात सणांच्या निमित्ताने सलग सुट्ट्या मिळाल्या होत्या. 2 ऑक्टोबर – गांधी जयंती
21 ऑक्टोबर – दिवाळी लक्ष्मीपूजन 22 ऑक्टोबर – बळी प्रतिपदा या दिवशी बाजार बंद होते. मात्र, दिवाळीच्या मुहूर्तावर विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
मंगळवारी झालेल्या शेवटच्या व्यवहार दिवशी, दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी कमजोरी पाहायला मिळाली.
जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे बाजाराची सुरुवातच मंदीने झाली आणि बंद होताना ही घसरण अधिक तीव्र झाली. सेन्सेक्स (BSE Sensex) 519 अंकांनी (0.62%) घसरून 83,459.15 वर बंद झाला. निफ्टी (NSE Nifty) 166 अंकांनी (0.64%) घसरून 25,597.65 वर स्थिरावला.
[ सूचना - शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बाजारातील चढ-उतार आणि जागतिक परिस्थिती यांचा थेट परिणाम गुंतवणुकीवर होऊ शकतो.]
