पटना : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून एनडीए एकहाती सत्तेकडे वाटचाल करत असल्याचे चित्र समोर आले आहे. या विजयामागे ‘महाराष्ट्र पॅटर्न’चा प्रभाव ठळकपणे जाणवतोय. महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला मिळालेल्या यशाचा ट्रेंड बिहारमध्येही जवळपास तसाच रिपीट झाला आहे. महिलांना थेट आर्थिक मदत देणाऱ्या एनडीएच्या योजनेने मतदारांमध्ये मोठा भावनिक आणि थेट लाभाचा संपर्क निर्माण केला, ज्याचा परिणाम मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यात आणि भाजप-एनडीएच्या निर्णायक आघाडीत दिसून आला. बिहारमध्ये मतदानाचा विक्रम झाला असून दोन्ही टप्प्यांत एकत्रित ६६.९० टक्के मतदान नोंदवले गेले. २०२० च्या तुलनेत तब्बल ९ टक्क्यांची वाढ झाली असून हा वाढीव मतदानाचा ओघ थेट एनडीएच्या खात्यात जमा झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ९० मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली, तर जेडीयू दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. जेडीयूने मुख्यमंत्रिपदावर दावा सादर केल्याचे समजते. लालू प्रसाद यादव यांच्या राजकीय प्रवासाला मोठा धक्का बसल्याचेही या निकालातून दिसून आले असून अनेक फेऱ्यांत त्यांच्या दोन्ही मुलांना पिछाडीवर राहावे लागले.
महाराष्ट्रातील सत्ता समीकरणांमध्ये राज्य सरकारने लागू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेने निर्णायक भूमिका बजावली. महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करणाऱ्या या उपक्रमामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळाली. लोकसभा निवडणुकांतील धक्का असूनही ‘लाडकी बहीण’ने संपूर्ण चित्र बदलले. बिहारमध्येही एनडीएने हा पॅटर्न हुबेहूब उतरवत निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी महिलांच्या बॅंक खात्यात १० हजार रुपये जमा केले. ‘तुमची योजना, तुमचे सरकार, तुमचे मत’ या संवाद मोहिमेच्या माध्यमातून थेट महिलांना संबोधित करण्यात आले. तेजस्वी यादव यांच्या ‘माझी बहीण’ योजनेने या मोहिमेला तोडीस तोड प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती योजना एनडीएच्या उपक्रमाच्या तुलनेत फिकी ठरली. मोठ्या संख्येने महिलांनी एनडीएच्या बाजूने मतदान केले आणि या टप्प्यावर निर्णायक मतदारांची भूमिका महिला मतदारांनी निभावली.
प्रचंड मतदान आणि महिलांच्या वाढत्या सहभागामुळे बिहारचा राजकीय पट एका झटक्यात बदलला. एक्झिट पोलपेक्षा अधिक मोठा विजय मिळवत एनडीएने सत्ता परत मिळवली असून नरेंद्र मोदींचा प्रचारातील करिश्मा आणि आर्थिक लाभाधिष्ठित महिला केंद्रित धोरण हा या विजयाचा केंद्रबिंदू ठरल्याचे मतदानानंतरचे स्वरूप दर्शवते. बिहारमध्ये महाराष्ट्राचा पॅटर्न ‘कॉपी-पेस्ट’प्रमाणे काम करताना दिसला असून एनडीएची ही रणनीती भविष्यातील निवडणुकांसाठीही निर्णायक मॉडेल ठरू शकते, अशी चर्चा आता राज्यात सुरू झाली आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
