पटना : बिहार निवडणूक निकाल 2025 मध्ये प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला एकही जागा न मिळाल्याने राज्याच्या राजकीय पटावर मोठी खळबळ उडाली आहे. 2024 मध्ये मोठ्या दिमाखात जन सुराजची घोषणा करून ‘बदल हवा’ या घोषणेनिशी प्रत्येक कुटुंबापर्यंत गेल्याचा दावा करणाऱ्या प्रशांत किशोर म्हणजे PK यांच्या राजकीय प्रवासाला पहिल्याच प्रयत्नात मोठा धक्का बसला आहे. तीन वर्षांची भव्य पदयात्रा, डिजिटल माध्यमांवरील प्रचंड लोकप्रियता, तिसरा पर्याय निर्माण करण्याचा दावा आणि क्रांतीचा आवाज देणाऱ्या प्रचारानंतरही PK यांना जनतेचा विश्वास मिळवता आला नाही.
निकालानंतर “नितीश कुमार यांना २५ पेक्षा जास्त जागा मिळाल्यास राजकारण सोडेन” या त्यांच्या मोठ्या आव्हानाचीही चर्चा अधिक रंगू लागली आहे. जन सुराजने महाआघाडीच्या मतांमध्ये फूट पाडत एनडीएला अप्रत्यक्ष मदत केल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे, तर महाआघाडीला या निवडणुकीत मोठ्या फटक्याचा सामना करावा लागला आहे.
प्रशांत किशोर यांचा प्रवास गावातून संयुक्त राष्ट्रांपर्यंत आणि तेथून थेट निवडणुकीची रणनीती आखणाऱ्या देशातील सर्वात यशस्वी चेहऱ्यांपैकी एकापर्यंत पोहोचलेला. बक्सरमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी UN च्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमामध्ये काम केले आणि तेथील डेटा विश्लेषण, सर्वेक्षण आणि जनसंपर्क यांचीच जोड त्यांच्या भविष्यातील राजकीय मोहिमांसाठी निर्णायक ठरली.
2012 च्या गुजरात निवडणुकीत भाजपा आणि नरेंद्र मोदींच्या मोहिमेतून त्यांचा रणनीतीकार म्हणून प्रवास सुरू झाला आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ‘चाय पे चर्चा’, 3D रॅली, मंथन, मायक्रो-टार्गेटिंग यांसारखे प्रयोग करून भारतीय निवडणूक व्यवस्थेची व्याख्या बदलून टाकली. त्यानंतर नितीश कुमार, ममता बॅनर्जी, स्टालिन, जगन रेड्डी, अमरिंदर सिंग, अरविंद केजरीवाल यांसारख्या अनेक नेत्यांना त्यांनी विजय मिळवून दिला. परंतु हे सर्व “इतरांच्या विद्यमान संघटनांवर” आधारलेले असल्याचे PK यांनी अनेक वेळा मान्य केले होते. स्वतःचा पक्ष चालवताना हीच संघटनात्मक ताकद त्यांच्या पाठीशी नव्हती आणि त्याचाच परिणाम निकालात प्रकर्षाने जाणवला.
2024 मध्ये जन सुराजची घोषणा करून PK यांनी बिहारचा राजकीय भूगोल बदलण्याचा प्रयत्न केला. तीन हजार किलोमीटर पदयात्रा, डिजिटल माध्यमांवरील ३० कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज, परदेशातून परतलेल्या बिहारमधील ५० ते ७० लाख स्थलांतरितांपैकी दोन-तृतीयांश स्वतःसोबत असल्याचा दावा या सर्व स्वप्नांच्या आधारावर त्यांनी २४० जागांवर उमेदवार उभे केले. परंतु अनुभवाचा अभाव, जातीय समीकरणांवरील कमकुवत पकड, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक मुळे रुजू न होणे आणि पारंपरिक राजकारणातील कठोर वास्तव यांतील तफावत जन सुराजला अंतिम टप्प्यात अडचणीत आणणारी ठरली.
पाटण्यातील राजकीय वर्तुळाने हा अंदाज आधीच वर्तवला होता आणि निकालांनी त्याचीच पुष्टी झाली. प्रशांत किशोर यांचा हा पराभव फक्त राजकीय अपयश नाही, तर ‘भूगोल बदलण्याचा आत्मविश्वास’ आणि ‘भूगोलाने दाखवलेली वास्तवता’ यांची तफावत अधोरेखित करणारा प्रसंग ठरला आहे.
अनेक नेत्यांना विजयाचा रोडमॅप देणारे PK, स्वतःसाठी तोच नकाशा रेखाटताना अडखळले. बिहारच्या राजकारणात तिसरा पर्याय निर्माण करण्याची संकल्पना जितकी आकर्षक होती, तितकीच ती जमिनीवर अंमलात आणण्याची लढत कठीण असल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. जन सुराजचे भवितव्य काय आणि PK यांची पुढील राजकीय भूमिका काय असणार, हा प्रश्न आता बिहारच्या राजकारणात अधिक गडदपणे उमटू लागला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------
