मला पत्नी मिळवून द्या! शरद पवारांना लग्नाळू तरुणाने थेट दिलेले भावनिक निवेदन व्हायरल !

शरद पवार



अकोला : “माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही…” असं थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलेलं एका तरुणाचं निवेदन सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. अकोल्यातील या तरुणाने राजकारणातील दिग्गज नेत्याकडे “लग्नासाठी” साकडे घालून सर्वच लग्नाळू मंडळींचं प्रतिनिधित्व केलंय, अशी चर्चा तरुणांमध्ये रंगत आहे!

शनिवारी अकोल्यात झालेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात पवार यांना अनेक नागरिकांनी आपापली निवेदनं दिली. त्यात एक वेगळंच निवेदन नजरेत भरलं कारण त्यात शेतजमिनीचा प्रश्न नव्हता, न रोजगाराचा विषय नव्हता, तर थेट “लग्नाचा अर्ज” होता. “माझं वय वाढतंय, एकटेपण असह्य झालंय. कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, मी तिच्या घरी राहीन आणि चांगला संसार करेन,” असं त्या तरुणाने पत्रात नमूद केलं आहे.

हे पत्र वाचल्यानंतर पवार साहेब काही क्षण शांत झाले, तर व्यासपीठावरील बाकीचे नेते एकमेकांकडे पाहत मंद स्मित करत होते. उपस्थित लोकांमध्ये मात्र हशा पिकला. पण या विनोदी वाटणाऱ्या घटनेमागे ग्रामीण भागातील तरुणांचा एक गंभीर प्रश्न दडलेला आहे – लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत!

शहरातल्या नोकरदार तरुणांपुढे स्मार्टफोन आणि स्टाईल असते; पण ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या मुलांपुढे काम, कर्ज आणि ऊन. त्यामुळे मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि गावाकडच्या मुलांच्या मागण्या घटल्या आहेत. “अशा वेळी या अकोल्याच्या भावाने जे पाऊल उचललं ते खरं तर आमच्या सगळ्या सिंगल बंधूंचं प्रतीक आहे,” असं सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट करून लिहिलं आहे.

या घटनेनंतर आता सिंगल तरुणांच्या संघटनांनी शरद पवारांकडे “सर्व राज्यभर लग्न अभियान राबवा” अशी मागणी करायची तयारी सुरू केली आहे, अशी चर्चा अकोल्यापासून पुण्यापर्यंत सुरू आहे. खरंच, शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर आता “लग्नकऱ्यांचाही” प्रश्न राजकारणाच्या अजेंड्यावर येतोय का, हे पुढचे काही दिवस सांगतील.


-----------------------------------------------------------------------------------------------------------




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने