रिझर्व्ह बँकेच्या साठ्यात 3.59 अब्ज डॉलरची वाढ
नवी दिल्ली | सोन्याच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर देशासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचा गोल्ड रिझर्व्ह तब्बल 3.59 अब्ज डॉलर्सने वाढला असून आता तो 102.36 अब्ज डॉलर्सच्या उंचीवर पोहोचला आहे. हा सलग सातवा आठवडा आहे ज्यामध्ये देशाचं सुवर्ण भांडार वाढलं आहे.
तथापि, दुसरीकडे भारताचा विदेशी चलनाचा साठा (Forex Reserve) कमी झाला आहे. 10 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात हा साठा 2.176 अब्ज डॉलर्सनी घटून 697.784 अब्ज डॉलर्स झाला आहे.
रॉयटर्सच्या आकडेवारीनुसार, आता भारताचा एकूण गोल्ड रिझर्व्हमधील वाटा 14.7 टक्के झाला आहे. जो 1990 च्या दशकानंतरचा सर्वाधिक आहे.
रिझर्व्ह बँकेने जानेवारी ते सप्टेंबर 2025 दरम्यान 4 टन सोने खरेदी केले आहे. तर 2024-25 आर्थिक वर्षात RBI ने तब्बल 57.5 टन सोनं विकत घेतलं होतं.\
तज्ञांच्या मते, “सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे त्याचं मूल्यांकन वाढलं आहे. त्यामुळे विदेशी चलन साठ्यात सोन्याचा वाटा नैसर्गिकरित्या वाढला आहे.”
त्यांनी सांगितलं जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सेंट्रल बँका डॉलरवरील अवलंबित्व कमी करत आहेत. पोलंड, उझबेकिस्तान आणि तुर्की या देशांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करून आपला रिझर्व्ह मजबूत केला आहे.
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, FCA (Foreign Currency Assets) मध्ये 5.60 अब्ज डॉलर्सची घट झाली असून ते आता 572.10 अब्ज डॉलर्सवर आले आहे. FCA मध्ये यूरो, पाउंड, आणि येन सारख्या चलनांच्या मूल्यातील चढ-उतार प्रतिबिंबित होतो.
_______