विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवून गेला

  


ओबीसी मुद्यावरून भुजबळांचे स्फोटक विधान 



बीड : मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाच्या मुद्यावरून स्फोटक विधान केले आहे. “मराठा समाज आणि आमचं अंतर पडलं ते अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे,” असे म्हणत त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. “आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी आहे, हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही,” असे भुजबळ म्हणाले.


यावेळी भुजबळांनी थेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधत म्हटले, “विखे आला आणि सर्व महाराष्ट्रात विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला!” त्यांनी भाजपवरही टीका करत म्हटले, “विखे पाटील कारण नसताना जरांगेकडे जातात. त्यामुळे भाजपच्या लोकांना सांगतो, तुमच्या नेत्यांना आवरा.”


भुजबळ म्हणाले, “राज्यात 54 टक्के ओबीसी, 13 टक्के दलित, 7 टक्के आदिवासी, 3 टक्के ब्राह्मण, त्यानंतर मुस्लिम आणि शेवटी मराठा समाज — असा आकडा आहे. आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत — एक न्यायालयात आणि एक रस्त्यावर.”


भुजबळांनी स्पष्ट केलं की ते पक्षाच्या आदेशावर नव्हे तर ओबीसींच्या हक्कांसाठी लढत आहेत. “जे कोणी ओबीसींच्या मुळावर उठतील त्यांना आडवे करा,” असा इशारा त्यांनी दिला.


मराठा आणि कुणबी या दोन स्वतंत्र जाती असल्याचा मुद्दा उपस्थित करत भुजबळ म्हणाले, “उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी स्पष्ट निर्णय दिला गेला आहे — मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही.” त्यांनी भाजपला उद्देशून म्हटलं, “ओबीसींच्या ताकदीवर तुम्हाला 145 आमदार मिळाले आहेत. त्यामुळे आता उपाय शोधा.”


भुजबळांनी विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीका केली. “नगरला आले नाहीत, पंढरपूरला आले नाहीत, बीडला आले नाहीत. कोणता दबाव आहे तुमच्यावर? तुम्ही सांगितलं होतं की माझ्याबरोबर आहात, मग आलात का नाही?” असा थेट सवाल त्यांनी केला.


छगन भुजबळांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा महाराष्ट्रातील ओबीसी-मराठा आरक्षण प्रश्न पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने