Breaking

Post Top Ad

बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

भोई समाजाच्या मागण्यांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देऊ : देवानंद पवार

भोई समाजाच्या मागण्यांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देऊ : देवानंद पवार
यशस्वी चर्चेनंतर उपोषण सुटले 

यवतमाळ : निळोणा व चापडोह जलाशयावर मत्स्यव्यवसायासाठी काढलेल्या निविदांची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी. या मुख्य मागणीसह भोई समाजाच्या इतर मागण्यांसाठी कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देऊ असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेश महासचिव व किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी भोई समाज संघटनेला दिले. या आश्वासना नंतर विविध मागण्यांसाठी यवतमाळ येथील जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर सुरु असलेले बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले.


देवानंद पवार यांच्या मध्यस्थीने व अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाचे सरचिटणीस हिम्मतराव मोरे यांच्या पुढाकाराने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्याशी या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी याबाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने संबंधित विभागाचे सचिव व इतर अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा करून तातडीने या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले. 

भोई समाजाला मत्स्यव्यवसायासाठी विविध कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी दूर करून त्यांना आपल्या परंपरागत व्यवसायासाठी कायदेशीर हक्क मिळावे यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देवानंद पवार यांनी भोई समाज संघाला दिले. 


निळोणा व चापडोह जलाशयावर मत्स्यव्यवसाय करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. याची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची समिती नेमावी व निविदा रद्द कराव्या हि उपोषणकर्त्यांची मागणी आहे. या भ्रष्टाचारामुळे मत्स्यव्यवसाय करणाऱ्या भोई समाजाच्या व्यावसायिकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर २८ ऑगस्ट पासून भोई समाज संघाचे आत्माराम बेडकर, उमेश लोखंडे, नरेश डोकडे, महादेव नागपुरे, अस्तिक करलूके, विठ्ठल नागपुरे हे  बेमुदत उपोषणाला बसले होते. संघाच्या मागण्यांसह इतर अडचणींबाबत समाधानकारक तोडगा निघाल्याने संघटनेने उपोषण मागे घेतले.


अखिल महाराष्ट्र भोई समाज संघाचे सरचिटणीस हिम्मतराव मोरे, शिवसेना कार्यकर्ते विशाल बरोरे, श्रीपाल कैथवास यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव जावेद अन्सारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, पल्लवी रामटेके, विशाल पावडे, शब्बीर खान, अजय किन्हीकर, प्रदीप डंभारे, उमेश इंगळे, प्रा.विठ्ठल आडे, हेमंतकुमार कांबळे, बबलीभाई, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पवार उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad