घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कापसी येथे प्लस पोलिओ लसीकरण कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे गावातील १२ बालकांना प्लस पोलिओ ड्रॉप ऐवजी सॅनिटाझर पाजण्यात आले. काही तासात या मुलांना उलट्या झाल्या. त्यानंतर सर्व मुलांना तातडीने यवतमाळ येथे दाखल करण्यात आले.
हि घटना म्हणजे निष्काळजीपणाचा कळस आहे. वैद्यकीय कर्मचारी नशा करून मोहिमेसाठी आल्याची शंका उत्पन्न व्हावी इतका हा बेजबाबदारपणा आहे. प्लस पोलिओ ड्रॉप ची बाटली व सॅनिटाझर ची बाटली यातला फरक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कळू नये हे आश्चर्यकारक आहे.
सॅनिटाझर चा तीव्र वास येतो तर पोलिओ ड्रॉप गंधहीन असते. हा फरक सामान्य व्यक्तीही ओळखू शकतो. पोलिओ बुथवर एकापेक्षा जास्त कर्मचारी असतात. कोणाच्याच लक्षात हि बाब येऊ नये? निष्पाप बालकांच्या जीवाशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार देवानंद पवार यांनी व्यक्त केला आहे. या घटनेची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले पाहिजे अशी मागणी देखील पवार यांनी केली आहे.
