Breaking

Post Top Ad

शुक्रवार, १ जानेवारी, २०२१

"जेष्ठांचा अनुभव नव्या पिढीसाठी खजिना":पोलीस अधिक्षक डाॅ.भुजबळ

"जेष्ठांचा अनुभव नव्या पिढीसाठी खजिना":पोलीस अधिक्षक डाॅ.भुजबळ
यवतमाळ : वयोवर्षे ६५ ओलांडलेले नागरिक हे जेष्ठ नागरिकांमध्ये मोडतात. आपल्यापेक्षा जास्त उन्हाळे-पावसाळे अनुभवलेल्या या नागरिकांचे कुटुंबासाठी तसेच समाजासाठी मोठे योगदान आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या अडचणींचे निराकरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नवीन पिढीसाठी तर त्यांचा अनुभव हा अमुल्य खजिनाच आहे, असे मत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी व्यक्त केले.


नववर्षाचे निमित्ताने पोलिस विभागामार्फत जेष्ठ नागरिकांच्या विविध तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच त्यासंबंधातील प्रकरणे संवेदनशीपणे हाताळण्यासाठी पोलिस अधिक्षक कार्यालयात जेष्ठ नागरिक सुरक्षा कक्ष उघडण्यात आला. या कक्षाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब चिंतावार, जेष्ठ पत्रकार न.मा. जोशी उपस्थित होते.


शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी कायदा केला आहे, असे सांगून पोलिस अधिक्षक डॉ. भुजबळ म्हणाले, जेष्ठ नागरिकांसाठी जिल्हास्तरावर जिल्हा समन्वय समिती कार्यरत आहे. जेष्ठ नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, आरोग्य विषयक बाबींचा समावेश आहे. या कक्षाच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांच्या तक्रारी, समस्या, अडीअडचणी सोडविण्यास मदत होईल. कक्षात आलेल्या प्रत्येकाच्या तक्रारीची योग्य दखल घेतली जाईल. जेष्ठांबाबतचा प्रत्येक प्रश्न कायद्याने न सोडविता समुपदेशाने सोडविला जाईल. मात्र काही प्रकरणात आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाईसुध्दा करण्यात येईल. समाजातील दु:खी किंवा अडचणींचा सामना करणारे लोक पोलिसांकडे येतात. या निमित्ताने दु:खी लोकांचे निराकरण करण्याची पोलिस विभागाला चांगली संधी आहे. पोलिस प्रशासन जबाबदार आणि संवेदनशील असले पाहिजे तसेच पोलिसांनी लोकाभिमुख राहून काम करावे, यावर आपला कटाक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले.


दरम्यान यावेळी जेष्ठ पत्रकार न.मा. जोशी म्हणाले की, जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक हे केवळ पोलिसच नाही तर एक उत्कृष्ट आणि संवेदनशील मनाचा माणूस आहे. प्रत्येक विभागात जेष्ठ नागरिकांना सन्मान मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिस अधिक्षकांसोबत चर्चा करण्यात आली, त्यावेळी त्यांनी अतिशय तळमळीने जेष्ठ नागरिकांचे प्रश्न समजून घेतले. तसेच नवीन वर्षाच्या निमित्ताने जेष्ठ नागरिक सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात येईल, असे सांगितले होते. पोलिस अधिक्षक कार्यालयात आज या सुरक्षा कक्षाचे उद्घाटन होत आहे, हे राज्यातील पहिले उदाहरण आहे, असेही न.मा.जोशी यांनी सांगितले.

यावेळी बाळासाहेब चिंतावार म्हणाले, जिल्ह्याच्या नवीन पोलिस अधिक्षकांसोबत चर्चा झाली, त्यावेळी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय झाला. माझ्या उभ्या आयुष्यात एवढा संवेदनशील एसपी मी बघितला नाही. आजच्या या कार्यक्रमाला यवतमाळसह दारव्हा, दिग्रस, नेर, पांढरकवडा आदी ठिकाणांवरून जेष्ठ नागरिक आले आहे. या कक्षाच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर निकाली निघतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी जेष्ठ नागरिक सुरक्षा कक्षाच्या 9112240466 या क्रमांकावर भ्रमणध्वनीने संपर्क साधून रितसर तक्रार नोंदविण्यात आली. तसेच महिला व बाल अत्याचार प्रतिबंध कक्षाच्या 9112240465 या क्रमांकावर महिला व बालकांसंबंधी तक्रार असल्यास संपर्क साधावा, असे जाहीर करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन व आभार सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी केले. यावेळी बाळासाहेब त्रिवेदी, राजन टोंगो, बाळासाहेब पाटील, भरत राठोड, राजीव निलावार, सतिश बनगिरवार, साधना बंडेवार, सुरेखा ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad