Breaking

Post Top Ad

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

विधान परिषद निवडणूक :शिक्षक मतदारसंघातील महाभारत!

विधान परिषद निवडणूक :शिक्षक मतदारसंघातील महाभारत!
एखाद्या राज्याचे विधिमंडळ एकगृही असावे की द्विगृही अर्थात विधानसभा आणि विधान परिषद असे द्विगृही असावे की केवळ विधानसभा असे एकगृही असावे याबद्दलचा निर्णय घटनाकारांनी त्या त्या राज्यांच्या विधानसभेच्या मर्जीवर सोडला आहे.त्या प्रमाणे सध्या देशात महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश अशा सहा राज्यात राज्यात विधानपरिषद आहे.

विधानपरिषदेच्या निर्मितीचा उद्देश विधी निर्मितीच्या कार्यात विविध व्यावसायिकगटांचे प्रतिनिधीत्व व्हावे हा आहे . विधान परिषदेत ४० पेक्षा कमी नाही आणि विधानसभेच्या सभासद संख्येच्या एकतृतीयांश पेक्षा जास्त नाही इतकी संख्या असावी हे संविधानाने निश्चित केले आहे. शिवाय कोणत्या प्रवर्गाचे किती प्रतिनिधी असावेत हेही घटनेने निश्चित केले आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत ७८ सभासद असतात.  त्यापैकी सात पदवीधरांचे आणि सात शिक्षकांचे प्रतिनिधी असतात. आपले प्रतिनिधित्व कोणी करावे हे सांगण्याचा अधिकार पदवीधर तसेच शिक्षकांना असल्यामुळे  पदवीधर मतदार संघात पदवीधारक नसलेले आणि शिक्षक मतदार संघात शिक्षक नसलेले ऊमेदवार सुद्धा उभे राहतात. या बाबतीतदोन मतप्रवाह आहेत .पदवीधर किंवा शिक्षक नसलेल्यांनी निवडणूक लढवणे म्हणजे संविधानाच्या आत्म्याशीच प्रतारणा करण्यासारखे आहे असा एक मतप्रवाह आहे. 

आमचे प्रतिनिधित्व कोणी करावे हे सांगण्याचा अधिकार पदवीधर किंवा शिक्षकांना असल्यामुळे निवडणूक कोणीही या मतदार संघात निवडणूक लढवू शकतो असा दुसरा मतप्रवाह आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की राजकीय पक्ष या निवडणुकीत उतरल्यामुळे संविधान करत्यांच्या हेतूलाच धक्का लागला आहे.शिक्षक किंवा पदवीधर मतदार संघामध्ये राजकीय पक्षांचा जेव्हापासून चंचू प्रवेश सुरू झाला तेव्हापासून निवडणुकीला राजकीय आखाड्याचे स्वरूप आले आहे. त्याआधी निखळ पदवीधर किंवा निखळ शिक्षक प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांचे  उमेदवार निवडणूक लढत असत.आता मात्र चित्र बदलले आहे.विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात सध्या निवडणूक सुरू आहे. या विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम अशा पाच मतदार संघातील असे शिक्षक ज्यांचा दर्जा माध्यमिक शिक्षक आपेक्षा कमी नाही आणि ते विगत तीन वर्षांपासून शिक्षक आहेत असे शिक्षक मतदार आहेत. 

अमरावती जिल्ह्यात १०५७०, यवतमाळ जिल्ह्यात ७५४५, बुलढाणा ७२०८,अकोला ६६५१ आणि वाशिम जिल्ह्यात ३८३० अर्थात एकूण ३५ हजार ८०४ इतके शिक्षक मतदार आहेत.

उमेदवारांची ही तोबा गर्दी झाली असून तब्बल २७ उमेदवार ऊभे आहेत.काहीउमेदवार बारावी पास देखील नाहीत. आतापर्यंत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,नुटा, विजुकटा विरुद्ध महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक परिषद सरळ लढत असायची. परिषदेचे दिवाकर पांडे आणि 'विमाशिसं'चे वसंतराव खोटरे यांनी प्रतिनिधित्व केले आहे. मात्र गेल्या खेपेस पासून विमाशिसं च्या नेत्यांमध्ये फूट पडली, डायगव्हाणे आणि वसंतराव खोटरे अलग झाले. वसंतराव खोटरे यांनी पश्‍चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची स्थापना करून संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष असलेले शिक्षण क्षेत्रातील झुंजार कार्यकर्ते आणि शिक्षक असलेले विकास भास्करराव सावरकर यांना उमेदवारी दिली आहे. यवतमाळात झालेल्या सभेत खोटरे यांनी म्हटले आहे की, विधान परिषदेत शिक्षकांचा प्रतिनिधी असला पाहिजे तो राजकीय पक्षाचा उमेदवार नसावा, ही घटनाकारांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सडेतोड वक्ता असलेल्या सत्यवादी न्यायप्रिय अस्मितादर्श ठरलेल्या मुर्तीजापूर येथील भारतीय ज्ञानपीठ उच्च माध्यमिक विद्यालयाचे २०१० पासून प्राचार्य असलेल्या विकास सावरकर यांना उमेदवारी दिली आहे! 

प्रा.न.मा. जोशी - ८८०५९४८९५२

संंघटनेच्या पहिल्या प्रांतिक अधिवेशनात आमसभेने विकास सावरकर यांची उमेदवारी मान्य केली आहे. संघटनेने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पद पगार सुरू केले वैद्यकीय परिपूर्ती रजा सवलत योजना लागू केली. शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण योजना पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे विनाअनुदान शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना अनुदान मिळवून देणे इतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध रद्द करणे अशा अनेक कामांचा उल्लेख वसंतराव खोटरे यांनी केला आहे येणारा काळ संकटांचा असून शिक्षकांचा प्रतिनिधी शिक्षक नसल्यास केला शिक्षकांच्या समस्या ची जाणीव नसते म्हणून प्रश्न प्रलंबित प्रलंबित असतात असा युक्तिवाद केला आहे. या निवडणुकीत  नुटा समर्थित विजूक्टाचे अध्यक्ष  डॉक्टर अविनाश बोर्डे उभे आहेत. जी आमदार बी. टी. देशमुख यांचा पाठिंबा हे त्यांचे बळ आहे. अकोल्याच्या शिवाजी महाविद्यालयात ते प्राध्यापक असून सिनेट चे सदस्य आहेत. शिवसेनेचे विद्यमान आमदार : श्रीकांत देशपांडे पुन्हा उभे आहेत. भाजपने नितीन धंदे यांना लढवले असून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही रिंगणात असून राजकुमार  बोधकुले परिषदेचे उमेदवार आहेत. शिक्षकांच्या प्रश्नासाठी संघर्षरत असलेल्या शिक्षक संघर्ष समितीच्या संगीता शिंदे,विदर्भ माध्यमिक शिक्षक  संघातर्फे प्रकाश काळपांडे लढत आहेत.


शिक्षक मतदारसंघात राजकीय नेत्यांनी उभे रहावे काय हा सध्या जोरदार चर्चेचा मुद्दा या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. शिक्षक मतदार संघातून शिक्षक उमेदवारच विधान परिषदेत निवडून गेला पाहिजे अशी भूमिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मात्र राजकीय पक्ष उमेदवार उभे करतात याला त्यांचा विरोध नाही ही त्यांच्या विधानातील विसंगती त्यांच्या कशी लक्षात येत नाही हाही प्रश्न आहे. राजकीय पक्षाच्या मर्यादा आमदारांवर येतात. त्यामुळे राजकीय पक्षाचा उमेदवार त्याच्या आत्म्याच्या आवाजाशी प्रतारणा करून काय न्याय देईल याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. दुसरे असे की पदवीधर मतदार संघातील विधान परिषदेतील आमदार बिल्डरांचेही प्रश्न विचारतात असा फडणवीसांचा आरोप आहे, वास्तविक पाहता आमदार हा कोणत्याही मतदार संघातील असला तरी त्याचे अधिकार हे इतर सर्व आमदारांच्या बरोबरच असतात.त्यांच्या अधिकाराबाबत भेदभाव करता येत नाही.बी. टी. देशमुख पदवीधरांचे प्रतिनिधी होते, मात्र त्यांनी विधान परिषदेत चौफेर प्रश्न विचारून एक नवा आदर्श निर्माण केला आणि उत्तम संसदपटू म्हणून पुरस्कार मिळवला हे विसरता येत नाही. मतदारसंघातला आमदार आहे म्हणून त्यांनी केवळ शिक्षकांचे प्रश्न विचारावेत असे घटनेला अजिबात अपेक्षित नाही हे‌ फडणवीस ‌ यांच्या  कसे काय लक्षात येत नाही हाही चर्चेचा विषय आहे.

लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad