खर्च करताना सावध रहा ! आगामी काळ कठीण’,अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी दिला मोठ्या मंदीचा इशारा !!

 


नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि अब्जाधीश उद्योजक जेफ बेझोस यांनी पुन्हा जागतिक अर्थव्यवस्थेबाबत इशारा देत सावधगिरीचा सल्ला दिला आहे. सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुढील काही महिन्यांत जागतिक बाजारपेठेत दीर्घकाळ टिकणारी मंदी येऊ शकते, असा इशारा देत ग्राहक आणि व्यावसायिकांना मोठे निर्णय घेताना काळजी घेण्याचे आवाहन केले. सध्या आर्थिक अनिश्चितता वाढलेली असल्याने महागडी खरेदी, भांडवली गुंतवणूक किंवा मोठ्या प्रमाणात नव्या प्रकल्पांमध्ये पैसा टाकताना संयम ठेवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

बेझोस यांनी पुढे बोलताना ग्राहकांनी कार, नवीन टीव्ही, इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा महागडे कंझ्युमर प्रॉडक्ट्स खरेदी करण्यावर काही काळ नियंत्रण ठेवावे, असे स्पष्टपणे सांगितले. येत असलेल्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात रोख पैसा आणि बचत यांचे महत्त्व वाढणार असल्याने अनावश्यक खर्च टाळल्यास पुढील संकटात स्वतःचे रक्षण होईल, असे त्यांनी सांगितले. लहान व्यावसायिकांसाठीही त्यांनी मोठा इशारा देत सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत अधिग्रहण, नवीन युनिट्स किंवा मोठा भांडवली खर्च करण्याचे टाळावे, कारण आर्थिक परिस्थिती खराब झाल्यास हाच खर्च सर्वात मोठा ओझा बनू शकतो.

आर्थिक संकटाबाबत सतर्कतेचा इशारा देताना बेझोस यांनी दीर्घकालीन भविष्याबद्दल मात्र आशावादी दृष्टिकोनही व्यक्त केला. अमेरिकन अर्थव्यवस्था आपल्या मूळ ताकदीमुळे पुन्हा उभारी घेते, असे ते म्हणाले. ‘अमेरिकन ड्रीम’ पूर्ण होईल, आणि भविष्यात सामान्य नागरिकांनाही अंतराळ प्रवास सहज शक्य होईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तथापि, बेझोस यांनी ग्राहकांना दिलेले हे आवाहन काही प्रमाणात अ‍ॅमेझॉनसाठीही उलट ठरू शकते. कारण ग्राहकांनी खरेदी कमी केल्यास त्याचा थेट परिणाम अ‍ॅमेझॉनच्या विक्रीवर होण्याची शक्यता आहे. अलीकडेच कंपनीने मंदावलेली मागणी, वाढती महागाई आणि बदललेली ग्राहकांची खरेदीची पद्धत यांचा हवाला देत तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याची योजना आखली असल्याचे उघड झाले होते. पुढील तिमाहीतही कंपनीचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता त्यांनी ऑक्टोबरमध्येच व्यक्त केली होती.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मूडीजनेही अमेरिकेतील आर्थिक परिस्थितीबाबत गंभीर अंदाज नोंदवला आहे. राज्यनिहाय आर्थिक डेटाच्या विश्लेषणातून अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे मूडीजचे मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क झँडी यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील मंदीचे परिणाम जगभरातील बाजारपेठांवर दिसून येतात. यापूर्वीदेखील अमेरिका टॅरिफ वाढविल्यानंतर त्याचा थेट फटका भारतासह विविध देशांना बसलेला होता. त्यामुळे बेझोस यांनी व्यक्त केलेला इशारा केवळ अमेरिकेसाठीच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

 

         ---------------------------------


/





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने