Breaking

Post Top Ad

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०

अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहचवा: जिल्हाधिकारी सिंह

अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहचवा: जिल्हाधिकारी सिंह
यवतमाळ : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हास्तरावरून हा निधी तालुकास्तरावर वितरीतसुध्दा करण्यात आला. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी तसेच नागरिकांना या निधीचे तातडीने वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.

जिल्ह्यात ज्या ठिकाणी परतीच्या पाऊसामुळे नुकसान झाले आहे, परंतु सदर ठिकाणी ६५ मी.मी. पेक्षा कमी पाऊस झालेला आहे, अशा शेती पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला होता. त्यानुसार कापूस क्षेत्र २ लक्ष ६४ हजार ६८२ हेक्टर व सोयाबीन क्षेत्र १ लक्ष ९९ हजार १० हेक्टर असे एकूण ४ लक्ष ६३ हजार ६९२ हेक्टर बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यासाठी प्रशासनाने २४ कोटी २७ लक्ष रुपयांचा प्रस्ताव पाठविला होता. विशेष म्हणजे २०११ च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील जवळपास सव्वाचार लक्ष हेक्टरसाठी ३१५ कोटी २६ लक्ष रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीसीद्वारे त्यांनी सर्व तालुकास्तरीय यंत्रणेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. शासनाच्या ९ नोव्हेंबरच्या पत्रानुसार जिल्ह्याला१८ कोटी ६ लक्ष रुपये प्राप्त झाले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे तसेच पशुधनाचे नुकसान, घरांची पडझड, मृत्यू आदींसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. या संपूर्ण निधीचे दोन-तीन दिवसात वाटप करण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने प्राधान्याने नियोजन करावे. कोणत्याही परिस्थितीत हा निधी नुकसानग्रस्तांना वेळेत मिळाला पाहिजे. तसेच दैनंदिन किती निधीचे वाटप झाले, याबाबतचा अहवाल रोज सायंकाळी जिल्हास्तरावर सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. निधी वाटपाबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सर्व बँकेच्या प्रतिनिधींना त्वरीत सुचना द्याव्यात, असेही आदेश त्यांनी दिले. यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तसेच सर्व तहसीलदार व्हीसीद्वारे सहभागी झाले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad