Breaking

Post Top Ad

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

"कोरोना व्हायरसचा धोका ओळखा"; पालकमंत्री संजय राठोड

"कोरोना व्हायरसचा धोका  ओळखा"; पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव हा नवजात बालक, तरुण, वयोवृध्द अशा सर्वच वयोगटातील लोकांना होत आहे. नेर तालुक्यात एकाच घरातील तीन भाऊ कोरोनामुळे दगावल्याची घटना नुकतीच घडली. तसेच कोव्हीड वॉर्डात व्हेंटीलेटरवर अवघ्या १७ वर्षाच्या मुलाला पाहून मन हेलावले. त्यामुळे कोरोनापासून वाचायचे असेल तर आतातरी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, असे कळकळीचे आवाहन वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.


नेर तालुक्यातील उत्तर वाढोणा येथे ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.


कोरोनाला हरवायचे असेल तर प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. सध्या कोरोना वर देशात औषधी तयारी झालेली नाही, अशा कठीण परिस्थितीत नागरिकांनी महामारी चा धोका ओळखून जबाबदारीने राहण्याची गरज आहे, असे सांगून पालकमंत्री राठोड पुढे म्हणाले की, शासन, प्रशासन, आरोग्य विभाग गत सहा महिन्यांपासून नागरिकांच्या आरोग्यासाठी झटत असून वारंवार आवाहन करीत आहे. तरीसुध्दा नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. भविष्यात जर आपण असेच बेजबाबदारपणे वागत राहिलो तर यापेक्षा आणखी गंभीर परिस्थती निर्माण होईल. आताच शहरात बेड मिळणे कठीण झाले आहे. शासन आणि प्रशासन आपल्यासाठी कटिबध्द तर आहेच, मात्र आता आपली जबाबदारीसुध्दा वाढली आहे. याच संकल्पनेतून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे.


जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तसेच मृत्युचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत सुपर स्पेशालिटी आणि स्त्री व नवजात शिशु रुग्णालयात अतिरिक्त 500 बेडची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. मात्र भविष्यात आणखी बेडची आवश्यकता पडू शकते. शिवाय सदन नागरिक खाजगी रुग्णालयात पैसे खर्च करून उपचार घेण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे आयएमएच्या खाजगी डॉक्टरांनी संपूर्ण जिल्ह्यात किमान 500 बेड उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

कोरोनाबाबत आजही ग्रामीण भागात बरेच गैरसमज आहेत. प्रशासनाला दीड लाख रुपये मिळतात, म्हणून पॉझिटीव्ह दाखविणे सुरू आहे, असा अपप्रचार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र यावर कोणीही विश्वास ठेवू नये. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अतिशय जोखीम उचलून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे. त्यांना सहकार्य करा. हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे, ऐवढ्या साध्या सुचनांची प्रत्येकाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. ही आपली सामुहिक जबाबदारी आहे. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरी तपासणीसाठी येणा-या चमुला सहकार्य करा. त्यांना योग्य माहिती द्या व ही मोहीम यशस्वी करा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

"कोरोना व्हायरसचा धोका  ओळखा"; पालकमंत्री संजय राठोड

दरम्यान यावेळी जि.प.अध्यक्षा श्रीमती पवार म्हणाल्या, कोरोनाबाबतच्या उपाययोजना, त्याची अंमलबजावणी तसेच नागरिकांच्या आरोग्याबाबत पालकमंत्री अतिशय दक्ष आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पीपीई कीट घालून ते कोव्हीड वॉर्डातील रुग्णांशी संवाद साधतात व त्यांना धीर देतात. आपापल्या भागात लोकप्रतिनिधींनी तसेच आशा स्वयंसेविकांनी मोहिमेच्या यशस्वीतेकरीता काम करावे. आशा ताईंचे मानधन वाढविण्याबाबत पालकमंत्र्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सहा महिन्यांपासून प्रशासन नागरिकांना सुचना देत आहे. मात्र त्याकडे नागरीक दुर्लक्ष करीत असल्यामुळे कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. हात धुणे, मास्क लावले, अंतर पाळणे हे नियम पाळले तर आपण सुरक्षित राहू शकतो. आपल्या कुटुंबाची जाबाबदारी आता आपल्यावर आहे. त्यामुळे या मोहिमेंतर्गत घरी येणा-या पथकापासून कोणतीही माहिती लपवू नका. मला काही होत नाही, या अविर्भावातही कोणी राहू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी  केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या जनजागृतीपर साहित्याचे विमोचन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना शपथ दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad