Breaking

Post Top Ad

रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला यवतमाळ जिल्ह्याचा आढावा;आतापर्यंत ४३ टक्के कुटूंबाचे सर्व्हेक्षण

व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला यवतमाळ जिल्ह्याचा आढावा;आतापर्यंत ४३ टक्के कुटूंबाचे सर्व्हेक्षण
यवतमाळ : दिवसेंदिवस कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असून जग दुस-या लाटेचा सामना करीत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या व मृत्युदर कमी करण्यासाठी तसेच प्रत्येक कुटुंबाची आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' ही मोहीम शासनाने सुरू केली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेतला. मुंबई येथून व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेले पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ व इतर अधिका-यांसोबत संवाद साधला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना वाढतोय त्यामुळे जनतेला सजग करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. वारंवार हात स्वच्छ धुणे, मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे या प्राथमिक बाबींची अंमलबजावणी केली तर आपण निरोगी राहून कोरोनापासून वाचू शकतो. उपचारापेक्षा सुरवातीपासून काळजी घेणे, हे कधीही चांगले आहे.

आरोग्याबाबत या प्रकारचा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशात एकमेव राज्य आहे. या माध्यमातून राज्याचा आरोग्याचा नकाशा तयार होणार आहे. कोरोनाच्या काळात तसेच इतरही आजारांच्या दृष्टीने या मोहिमेद्वारे होणारी आरोग्य साक्षरता नेहमीसाठी उपयोगी पडेल. सर्वांना या मोहिमेचे गांभिर्य कळले असून प्रत्येक कुटुंब यात सैनिक आहे. 'मी सुरक्षित तर माझे कुटुंब सुरक्षित' ही भावना सर्वांनी ठेवावी. कोरोनावर लस कधी येणार माहित नाही, मात्र सध्यास्थितीत तरी 'मास्क' हीच महत्वाची लस आहे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे ही मोहीम गांभिर्याने राबवा, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.


'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' ही लोकचळवळ; पालकमंत्री


व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला यवतमाळ जिल्ह्याचा आढावा;आतापर्यंत ४३ टक्के कुटूंबाचे सर्व्हेक्षण
नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात येत आहे. केवळ कोरोनाबाबतच नाही तर इतरही आजारांचा डाटा या माध्यमातून जिल्ह्यात व राज्यस्तरावर  जमा होत आहे. प्रत्येक जण या मोहिमेत योगदान देत असून 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' ही लोकचळवळ होणार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. तसेच संपूर्ण जिल्हा प्रशासनाने मोहिमेच्या यशस्वीतेकरीता अतिशय उत्तम नियोजन केले आहे. जिल्हा प्रशासनाचे चांगले प्रयत्न असून नागरिकांनीही सर्व्हेक्षणासाठी घरी आलेल्या पथकाला सहकार्य करून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. 

 

व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला यवतमाळ जिल्ह्याचा आढावा;आतापर्यंत ४३ टक्के कुटूंबाचे सर्व्हेक्षण

'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' विषयी माहिती देतांना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले, या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ६ लाख ५६ हजार कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असून यात ग्रामीण भागातील ४ लक्ष ८९ हजार तर शहरी भागातील १ लक्ष ७६ हजार कुटुंबाचा समावेश आहे. यासाठी जिल्ह्यात २८६१ टीमचे गठण करण्यात आले आहे. शहरी भागात ३१० टीमद्वारे तर ग्रामीण भागात २५५१ टीमद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. १५ सप्टेंबर रोजी या मोहिमेचा शुभारंभ जिल्ह्यात करण्यात आला. आतापर्यंत २ लक्ष ७७ हजार कुटुंबाच्या गृहभेटी झाल्या असून जिल्ह्यात ४३ टक्के सर्वेक्षणाचे काम झाले आहे. गृहभेटीदरम्यान २१७५ जणांना लक्षणे आढळली तर को-मॉरबीड नागरिकांची संख्या २२१५४ आहे. यात ग्रामीण भागात १७४९२ तर शहरी भागात जवळपास पाच हजार को-मॉरबीड आहेत. यापैकी ८०० जणांना वैद्यकीय संस्थेत रेफर करण्यात आले आहे. तसेच १८०२ नागरिकांची नमुने तपासणी करण्यात आली असून यापैकी १०४ जण पॉझिटीव्ह  आढळल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.   सदर व्हीसीला अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार    व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी पी.एस.चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडीसीन विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके, डॉ. गिरीश जतकर, डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ. विजय डोंबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, पालिका प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad