संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की तुम्ही लवकर बरे व्हा”

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या गंभीर आजाराबाबत सोशल मीडियावर माहिती दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी नुकतेच समाज माध्यमावर  पत्र शेअर करत सांगितले की, त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला असून डॉक्टरांनी त्यांना दोन महिन्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर ते काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणार आहेत.

संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, “आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम प्रेम आणि विश्वास दाखवला. पण सध्या माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बदल झाल्याचे निदर्शनास आले आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र मला खात्री आहे की मी ठणठणीत बरा होऊन नवीन वर्षात पुन्हा आपल्या भेटीस येईन.”

राऊत यांच्या या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्काळ प्रतिक्रिया दिली. त्यांनी समाज माध्यमावर राऊत यांचे पत्र शेअर करत लिहिले, “संजय राऊतजी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो.” पंतप्रधानांच्या या संदेशाला राऊत यांनीही उत्तर दिले. “आदरणीय पंतप्रधानजी, आपले मनःपूर्वक आभार! माझे कुटुंब आपले आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र!” असे म्हणत त्यांनी मोदींना धन्यवाद दिले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून शिवसेना आणि भाजपात मतभेद झाले. त्यानंतर संजय राऊत हे रोज सकाळी माध्यमांना बाईट देत राजकीय वातावरण तापवणारे प्रमुख चेहरे ठरले. भाजपाने त्यांच्या पत्रकार परिषदांना ‘सकाळचा भोंगा’ असे नाव दिले होते. तरीदेखील राऊत सातत्याने महायुती सरकारवर कठोर टीका करत राहिले.

राज्यात पुढील दोन ते तीन महिन्यांत स्थानिक स्वराज संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राऊत यांच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीसाठी ही एक मोठी पोकळी निर्माण होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अनेक नेत्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने