ठेकेदाराला बसला ११ लाखांचा जबरदस्त फटका
पुणे : पुण्यात सायबर ठगांनी एका ठेकेदाराला तब्बल ११ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही फसवणूक एका विचित्र ऑनलाइन जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात आली. या जाहिरातीत लिहिले होते “जो मला गर्भवती बनवू शकतो, अशा व्यक्तीची शोध आहे.” या जाहिरातीवर क्लिक करणे त्या ठेकेदाराला इतकं महाग पडलं की काही दिवसांतच त्याच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदाराने त्या ऑनलाइन जाहिरातीला प्रतिसाद दिल्यानंतर त्याला काही अनोळखी व्यक्तींचे फोन येऊ लागले. या ठगांनी वेगवेगळ्या कारणांखाली त्याच्याकडून रक्कम मागायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी अगदी कमी रक्कम घेतली, ज्यामुळे ठेकेदाराचा त्यांच्यावर विश्वास बसला. परंतु नंतर त्यांनी हळूहळू अधिक रक्कम मागायला सुरुवात केली आणि एकूण ११ लाख रुपयांपर्यंत त्याला फसवलं.
पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे की या सायबर ठगांच्या टोळीचा काम करण्याचा पद्धतशीर आणि वेगळाच डाव होता. ते सुरुवातीला पीडित व्यक्तीकडून प्रोसेसिंग फी, मेंबरशिप फी किंवा हिडन चार्जेसच्या नावाखाली लहान लहान रक्कम घेत आणि विश्वास बसल्यावर मोठी रक्कम उकळत. ठगांनी पीडिताला सांगितलं की, "तुमचं काम सुरू करण्यासाठी आधी पूर्ण पेमेंट करावं लागेल." यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने ११ लाख रुपये घेतले.
पीडित ठेकेदाराला जेव्हा या संपूर्ण प्रकाराचा अंदाज आला, तेव्हा त्याने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. त्याच्या तक्रारीनुसार पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठगांचा शोध सुरू आहे. या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे की ऑनलाइन जाहिरातींमधील आकर्षक ऑफर्स आणि विचित्र प्रस्तावांपासून सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे.
