यवतमाळ, दि. ६ ऑगस्ट : कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या नातेवाईकांच्या संमतीनेच मृतदेह पॅक करून अंत्यविधीकरीता नगर परिषदेकडे दिला गेला. मृत्यूपुर्वी रुग्णाची मुलगी रुग्णालयात उपस्थित होती तसेच संबंधित मयत रुग्णाने रुग्णालयात भरती असतांना रुग्णालयाकडे कोणत्याही वस्तु जमा केल्या नसल्याने त्याच्या वस्तुंशी रुग्णालयाचा संबंध नसल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे.
सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत मुभा
यवतमाळ जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत वगळून उर्वरीत ठिकाणी अबकारी अनुज्ञप्त्या सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी एका आदेशान्वये मुभा दिली आहे.
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘मृत्यू झालेल्या कोरोनाबाधिताच्या वस्तु देण्यास रुग्णालयाचा नकार’ या मथळ्याखालील प्रकाशित बातमीच्या अनुषंगाने रुग्णालयामार्फत त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालनानुसार कोरोना संसर्ग झालेल्या कामगार रुग्णाच्या मृत्युच्या एक तासापूर्वी तक्रारकर्ती मुलगी रुग्णालयात उपस्थित होती. मृत्यूनंतर मुलीने वडीलांच्या अंगावर असलेले दागिने व मोबाईल कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याकडे मागितलेले नाही. तसेच महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाकडे रीतसर तक्रार देखील नोंदविलेली नाही.
विलगीकरण कक्षातील सिस्टर यांना समितीने विचारणा केली असता मृत व्यक्तीने त्यांचेकडे असलेले कोणतेही दागिने, मोबाईल वा इतर वस्तू दिले नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे मृतकाचे अंगावर दागिने व मोबाईल होते किंवा नाही याबाबत प्रशासनाला माहिती नसल्याचे अहवालात म्हटले आहे. शासन नियमाप्रमाणे नातेवाईकांच्या संमतीनंतरच मृतदेहावर नगर परिषदेमार्फत अंत्यविधी पार पाडण्यात आला. अंत्यविधीचे फोटो व व्हिडीओ चित्रीकरण नगर प्रशासनाची बाब असल्याचेही चौकशी समितीने अहवालात नमुद केले आहे.