Breaking

Post Top Ad

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

'पाॅझिटिव्ह रूग्णांना नर्सने बांधली राखी'

'पाॅझिटिव्ह रूग्णांना नर्सने बांधली राखी'

यवतमाळ,दि.३ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी जिल्हा प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा तेवढयाच क्षमतेने लढत आहे. भरती असलेल्या रुग्णाला कोरोनामुक्त करणे, हे एकच ध्येय आरोग्य यंत्रणेने ठेवले आहे. एवढेच नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासोबतच रुग्णांसोबत असलेले ऋणानुबंध जपण्यावर भर दिला जात आहे. येथे भरती असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रक्षाबंधननिमित्त राख्या बांधून येथील नर्स स्टॉफने मानवतेचा परिचय दिला आहे.

गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय व ग्रामस्तरावरील सर्व यंत्रणा) रुग्णसेवेत स्वत:ला झोकून दिले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणा-या प्रत्येक व्यक्तिचा जीव वाचला पाहिजे, यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. तसेच भरती असलेला प्रत्येक जण कोरोनामुक्त झाला पाहिजे, असाच त्यांचा मानस आहे. यात सण, उत्सवाची पर्वा न करता निरंतर सेवा सुरु आहे. घरी सण साजरा न करता येथील कोरोनाबाधित रुग्णांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचा निर्णय येथील संपूर्ण नर्सने घेतला. त्यानुसार पीपीई किट घालून येथे भरती असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना या नर्सने राख्या बांधून अनोखी भेट दिली. यावेळी सर्व नर्सने आस्थेवाईपने रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या हातावर राखी बांधली तसेच रुग्णांचे आशिर्वादसुध्दा घेतले. 

स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मानवतेच्या भावनेतून उपचार : रुग्णाच्या नातेवाईकाची प्रतिक्रिया

कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संपूर्ण डॉक्टर्स व स्टाफ स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मानवतेच्या भावनेतून उपचार करीत असल्याची प्रतिक्रिया कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकाने दिली आहे. याबाबत त्यांनी पत्र लिहून महाविद्यालयाच्या प्रशासनाचे आभार मानले आहे. दर्यापूर, जि. अमरावती येथील वैद्यकीय प्रतिनिधी, त्यांची पत्नी व लहान भाऊ असे तिघेही जण १८ जुलै  रोजी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. कारण त्यांच्या लहान भावाला कोरोनासदृष्य लक्षणे होती.
त्याचा रिपोर्टसुध्दा पॉझेटिव्ह आला होता. त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्तिच्या अत्यंत निकटच्या संपर्कातील असल्यामुळे रुग्णाचा मोठा भाऊ आणि त्याची वहिनीसुध्दा भरती झाले. योग्य उपचारानंतर वैद्यकीय प्रतिनिधीला व त्यांच्या पत्नीला महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली. तर त्यांचा लहान भाऊ जो कोरोनाबाधित आहे, त्याच्यावर अजूनही वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी घेतलेली मेहनत, मानवतेच्या भावनेतून केलेली सेवा या सर्व बाबी सुट्टी झाल्यानंतर वैद्यकीय प्रतिनिधी असलेल्या व्यक्तिने पत्राद्वारे महाविद्यालयाला कळविले आहे. येथील अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, आया, मावशी, सफाई कामगार सगळे जण अगदी मनापासून स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता रुग्णसेवेत पूर्णपणे झोकून काम करीत आहे. कुठेही जात, पात, धर्म, पंथ, उच्च, नीच असा भेदभाव आढळला नाही. विशेष म्हणजे मेडीसीन विभाग, एक्स-रे विभाग, छातीच्या उपचाराचा विभाग व इतर विभागामध्येही अतिशय चांगला समन्वय पाहायला मिळाला. औषधी, मानवता व सहकार्य यांचा त्रिवेणी संगम वैद्यकीय महाविद्यालयात अनुभवायला मिळाला.  गत 40 वर्षांपासून वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहो, मात्र येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान आलेला सुखद अनुभव मनाला भावून गेला, असेही दर्यापूर येथून व्यक्तिने पत्राद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad