'भांबोरा येथे तैनात पोलिंसाना गावातील ताईने बांधली राखी

भांबोरा येथे तैनात पोलिंसाना रक्षाबंधन
यवतमाळ, दि. ३ : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्वच पोलिस घरदार सोडून कर्तव्यावर हजर आहेत. सणासुदीच्या दिवसांत आप्तस्वकीयांपासून दूर असलेले पोलिस कर्तव्याला प्रथम प्राधान्य देतात. त्यातच मग एखादा उत्सव किंवा अनोखी भेट ड्यूटीवर असतांनाच नागरिकांकडून मिळाली तर जवानांचाही आनंद द्विगुणीत होतो. अशीच भेट आज रक्षाबंधननिमित्त घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील पोलिसांना मिळाली. गावातील महिलांनी येथे ड्यूटीवर तैनात असलेल्या पोलिसांचे औक्षवण करून त्यांना राख्या बांधल्याने पोलिसही भारावून गेले.

कोरानाच्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या वर्दळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांचा एकमेकांशी संपर्क येऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांची तैनाती ठेवण्यात आली आहे. त्यातच घाटंजी तालुक्यात भांबोरा येथे गत आठवड्यात पोलिसांवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. या गावातून आतापर्यंत १८ पॉझिटीव्ह रुग्ण आल्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांचे नमुने घेण्यासाठी गेलेल्या पथकावर समाजकंटकांनी दगडफेक केली होती. यात आरोग्य कर्मचा-यांसोबत काही पोलिसही जखमी झाले. गावात तणावाचे वातावरण होते. मात्र पोलिस विभाग व इतर यंत्रणांनी लोकांचा गैरसमज दूर करून गावाच्या भल्यासाठीच आम्ही नमुने घेत आहोत. सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

नागरिकांनीही समजूतदारपणा दाखवत झालेली चूक मान्य केली व यानंतर असा प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही दिली. गत चार दिवसात या गावातून ४०० नमुने घेण्यात प्रशासनाला यश आले आहे. विशेष म्हणजे सौहार्दपूर्ण वातावरणात आज रक्षाबंधननिमित्त गावातील महिलांनी तैनात असलेल्या पोलिस अधिकारी व जवानांना राखी बांधून अनोखी भेट दिली.  यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, घाटंजीचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला, नायब तहसीलदार राठोड, आरोग्य विभागाचे मसराम आदी उपस्थित होते.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने