कोरोनाच्या काळात ग्रामीण महिलांनी केली 13 हजार परसबागेची निर्मिती
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), कृतीसंगम अंतर्गत दि. २५ जून ते १५ जुलै २०२० या कालावधीत “माझी पोषण परसबाग विकसन मोहीम” हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील गर्भवती, स्तनदा माता, बालके आणि किशोरवयीन मुली यांना आहारातून विविध मूलद्रव्ये, खनिजे, लोह आणि प्रथीने इत्यादी पोषकतत्वे मिळावे आणि त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ व्हावी, म्हणून या मोहिमेंतर्गत पोषण परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच्या काळातही ग्रामीण महिलांनी १३ हजार २८७ परसबागेची निर्मिती करुन महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळविला. तर वर्धा जिल्ह्याने ८ हजार २८८ परसबागा तयार करून द्वितीय क्रमांक तर अमरावती जिल्ह्याने ६ हजार २१७ परसबागांची निर्मिती करून तृतीय क्रमांकावर स्थान मिळविले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये आहार, पोषण व स्वच्छता विषयक कार्यक्रम गत तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे.
सदर मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांच्या मार्फत वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचे उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक नीरज नखाते, कृतीसंगमचे जिल्हा व्यवस्थापक सुजित क्षिरसागर यांनी सांगितले.
त्यामध्ये ग्रामीण भागात पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः गरोदर माता, स्तनदा माता, ६ ते २४ महिने वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्या आहारामध्ये नियमित स्वच्छ व जैविक पद्धतीने पिकविलेला ताजा भाजीपाला व फळे इ. चा समावेश व्हावा याकरीता प्रयत्न केले जात आहेत.सदर मोहिमेत तयार करण्यात आलेल्या परसबागांमुळे ग्रामीण भागातील कुटुंबाना घरच्या घरी भाजीपाला व फळे उपलब्ध झाली तसेच कुटुंबाचा भाजीपाला वरील खर्च देखील वाचला. विशेष म्हणजे ‘माझी पोषण परसबाग विकासन मोहीम’ अंतर्गत जिल्ह्याला ३२८० वैयक्तिक, सामुहिक परसबागा विकसीत करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यवतमाळ जिल्ह्याने मात्र ४०५ टक्के काम करून १३२८७ परसबागा विकसीत केल्या. याबाबत राज्याच्या उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना पत्राद्वारे अभिनंदन कळविले आहे.