Breaking

Post Top Ad

शनिवार, १८ जुलै, २०२०

चंद्रपुर मध्ये कडक टाळेबंदी; जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केलं आवाहन

चंद्रपुर मध्ये कडक टाळेबंदी; जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केलं आवाहन

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध तालुक्याची शहरे, चंद्रपूर शहर येथे सुरू करण्यात आलेला लॉकडाऊन हा सध्या जिल्ह्याच्या, शहराच्या घराघरांमध्ये कोणी कोरोना संक्रमित रुग्ण तर नाही हे शोधण्यासाठी आहे. उगीच कुणाला घरात बसविण्यात आले नाही. त्यामुळे घराबाहेर पडू नका. लक्षणे दिसल्यास तातडीने संपर्क साधा. बाहेर जाऊन आला असाल तर स्वतःहून क्वारंटाईन व्हा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना व्हिडीओ संदेश देताना त्यांनी चंद्रपूर शहर व लगतच्या परिसरात सुरू केलेल्या टाळेबंदी मागील भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोना संदर्भात केंद्र व राज्य सरकारने जारी केलेल्या दिशा निर्देशानुसार योग्य दिशेने वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा सहभाग आहे. आपल्या येथे सुदैवाने कोणी मृत्यूमुखी पडले नाही. मात्र कोरोना आजार नियंत्रित करायचा असेल, तर सध्या चंद्रपूर शहर व लगतच्या परिसरात सुरू झालेल्या टाळेबंदीच्या काळात घराघरातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे.
जर कोणतीही लक्षणे असतील तर तातडीने माहिती द्या. वैद्यकीय मदत घ्या. बाहेरुन आले,असाल तर न लपवता माहिती द्या. स्वतः वेगळे रहा. लक्षणे असतील तर स्वॅब चाचणी करून घ्या.
जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात अँटीजेन चाचणी सुरू आहे. लक्षणे असणाऱ्यांनी तातडीने या चाचणीचा उपयोग घ्यावा. १५ ते ३० मिनिटांमध्ये याद्वारे माहिती पुढे येते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी चाचणी करून घेणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणचे लोक कुठे अपडाऊन करत असतील तर त्यांनी ते थांबवावे. पुढील काळात रुग्ण संख्या वाढल्यास अशा चोरून-लपून माहिती न देता रेड झोन मध्ये जाणे-येणे करणाऱ्यावर सक्त  कारवाई केली जाईल. प्रसंगी त्यांच्यावर पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली जाईल. त्यामुळे आपला जिल्हा, शहर, कुटुंब व स्वतःच्या बचावासाठी या लढ्यामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शनिवारी सायंकाळपर्यंत रुग्ण संख्या २६० झाली आहे. ही रुग्णसंख्या झपाट्याने पुढच्या काळात वाढणार आहे. मात्र रुग्ण डबल होण्याचा सध्या कालावधी १४ दिवसांचा आहे. हा कालावधी मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचे आहे. म्हणजे आता जो चौदा दिवसांचा कालावधी आहे, तो महिना दोन महिन्यांच्या वर जाणे गरजेचे आहे. हा कालावधी वाढविण्यासाठी रुग्ण संख्या कमी होणे, रुग्णांची साखळी तुटणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी आता ज्या पद्धतीने सहकार्य सुरू आहे. त्याच पद्धतीने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये वाढणाऱ्या बाधितांची संख्या लक्षात घेता, काही इमारती देखील ताब्यात घेण्यात येणार आहे. याठिकाणी अलगीकरण कक्ष तयार करण्यात येईल. कोरोना संदर्भात उपाय योजना करणे हे सर्वस्वी शासकीय यंत्रणेचे काम असून यासाठी ही यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी या यंत्रणेवर विश्वास ठेवावा. अतिशय उत्तम पद्धतीचा उपचार जिल्ह्यांमध्ये भेटत असून स्वतःच्या आजाराची कोणत्याच परिस्थितीत लपवाछपवी न करता तातडीने उपचार मिळावा. माहिती, तक्रार आणि मदतीसाठी  1077 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad