Breaking

Post Top Ad

शनिवार, १८ जुलै, २०२०

'कोरोना रूग्ण कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तातडीची बैठक'

कोरोना रूग्ण कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तातडीची बैठक

कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्याबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा
यवतमाळ : जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही प्रशासन व नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे. याबाबत प्रशासन 'हायअलर्ट' मोडवर राहून काम करीत आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी करण्याबाबत प्रशासनाकडून करावयाच्या उपाययोजनेसंदर्भात जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जि.प.चे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णरनाथ पांचाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, शहरासोबतच मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. नेर, दिग्रस, पुसद, दारव्हा येथील तालुकास्तरीय यंत्रणेने विशेष काळजी घ्यावी. तसेच प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. रुग्णांची संख्या न वाढण्यासाठी संबंधित गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार आदींनी प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा घ्यावा. तसेच नागरिकांच्या आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष केंद्रीत करावे. 
संशयीत रुग्ण आढळले तर त्यांचा स्वॅब त्वरीत घ्यावा व कोणताही विलंब न करता तो प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठवावा. रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे आता रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. या किट आरोग्य विभागाने त्वरीत उपलब्ध करून द्याव्यात किंवा संबंधित यंत्रणेने त्या खरेदी कराव्या. आरोग्य यंत्रणेवरचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संशयीत रुग्णांना ठेवण्यासाठी मंगल कार्यालये, हॉटेल्स आदींबाबत नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी केल्या. 
तत्पूर्वी जिल्हाधिका-यांनी जि.प.चे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.नागरिकांना आवाहन : नागरिकांनी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अनेक नागरिकांना अजूनही याचे गांभीर्य नसून ते बिनधास्तपणे वावरत आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे संसर्ग पसरण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यकपणे बाहेर पडू नये. आपल्या घरातच आपण सुरक्षित आहोत, याची जाणीव ठेवावी. अत्यावश्यक असेल तर मास्क लावूनच बाहेर पडा. कुठेही गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंग ठेवणे ही बाब या विषाणूची मानवी साखळी तोडण्यासाठी अतिशय महत्वाची आहे. त्याचे नागरिकांनी पालन करावे. आपले हात साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ करावे. या संकटाच्या काळात सर्व जिल्हावासियांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad