आर्णी शहरातील ग्रीन पार्क येथील एक पुरुष व एक महिला पॉझिटीव्ह आले आहेत.
यवतमाळ : जिल्ह्यात सुरवातीला एकेरी अंकात वाढणारा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा गत काही दिवसांपासून रोज दुहेरी अंकात वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यात तब्बल ६८ पॉझिटीव्ह रुग्णांची नव्याने भर पडल्याने साहाजिकच चिंता वाढली आहे. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले सहा जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात रविवारपर्यंत ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २३८ होती. यात आज (दि.२७) तब्बल ६८ नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा ३०६ वर पोहचला. मात्र 'पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या सहा जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ३०० आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे २६८ तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले ३२ जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८१२ झाली आहे.
यापैकी ४४६ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २६ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ६४ जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत १३४०७ नमुने पाठविले असून यापैकी १२०७८ प्राप्त तर १३२० अप्राप्त आहेत. तसेच ११२६६ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
