Breaking

Post Top Ad

सोमवार, २७ जुलै, २०२०

पोलीस योद्धा उपक्रमाचा शुभारंभ

पोलीस योद्धा उपक्रमाचा शुभारंभ

चंद्रपूर: कोरोना संक्रमण काळामध्ये पोलीस दलाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावेत यासाठी पोलीस योद्धा उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दिनांक २७ जुलै रोजी करण्यात आला. भरोसा सेल या उपक्रमात पीडित महिला व बालके यांच्याकरिता एकाच छताखाली समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा देखील त्यांनी यावेळी शुभारंभ केला. पोलीस मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पोलिस योद्धा म्हणून सहभागी झालेल्या युवकांना पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पोलीस योद्ध्यांची कीट देण्यात आली. या किटमध्ये टी-शर्ट, आयकार्ड तसेच सुरक्षेविषयीच्या वस्तू देण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, कोरोना संसर्ग काळात पोलीस विभागाने पोलीस योद्धा उपक्रमाद्वारे युवकांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे. युवकांनी पोलीस  योद्धा  उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील पीडित महिला व बालके यांना आधार देण्याचे काम भरोसा सेलद्वारे होणार असल्याचे मत देखील त्यांनी  व्यक्त केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाला नाका-बंदी, बंदोबस्त पासून तर कोविड केअर सेंटरवरील बंदोबस्ता पर्यंत पोलीस विभागाला अनेक जबाबदारी पार पाडावी लागत आहे. पोलीस विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी पोलीस योद्धा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील युवकांना पोलिसांसोबत १५ दिवस काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत यामध्ये ४०० युवकांनी सहभाग नोंदवला आहे.

जिल्ह्यातील पीडित महिला व बालके यांच्या समस्या अडचणी सोडविण्यासाठी भरोसा सेल पोलिस विभागाने सुरू केलेला आहे. या भरोसा सेल उपक्रमांतर्गत पीडित महिला व बालके यांना एकाच छताखाली समुपदेशन मार्गदर्शन केल्या जात आहे. घरगुती हिंसा, कौटुंबिक समुपदेशन, वाद-विवाद मिटविण्यासाठी तज्ञ सल्लागाराद्वारे समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच जिल्हा स्तरावर संरक्षण अधिकारी नेमलेले असून २४ तासाच्या आत दोषींवर कारवाई करणे शक्य होत आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे तसेच पोलीस दलातील अन्य अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सायबर सेलचे मुंडे यांनी केले. दोन्ही योजनेत सहभागी प्रातिनिधिक लोकांना या वेळी कीटचे वाटप व सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad