शिवसेनेचा जन्म अन्याय-अत्याचार विरोधात लढण्यासाठी झाला आहे. शिवसेनाप्रमुखांची 'तीच' परंपरा मी, पुढे घेऊन जातोय. विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही, संस्कृती आहे. पण आपल्या सोबत राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. ते राजकारण मोडीत काढल्यामुळे मी आज तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसलेला दिसतो असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त व्यक्त केले. यावेळी ठाकरेंनी भविष्यात शिवसैनिकांना पंतप्रधान पदावर बसवणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला.
माझा शिवसैनिक संकटाला घाबरणारा नसून संकटाशी दोन हात करणारा शिवसैनिक आहे. शिवसेनेच्या शाखा आता दवाखाने बनले आहेत. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहे. जीवाची पर्वा न करता शिवसैनिक झटत आहे. शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही, डगमगणार नाही, हा शिवसैनिक सोबत असेपर्यंत मला कोणाचीही भीती नाही. शिवसेना ही एक वादळ आहे, त्यामुळे आम्हाला इतर वादळाची पर्वा नाही, असे परखड मत यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या राज्यातील नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोरोना, निसर्ग चक्रीवादळात शिवसेना व सरकारने केलेल्या कामाबद्दल माहिती दिली. भाजपने केलेल्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं. शिवसेना विचारधारा बदललेली नाही. पण शिवसेना कुणापुढे लाचार ही होणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना यावेळी दिली.