धानाच्या शेतात सापडलेल्या पाच फूट लांबीच्या मगरीला एका शेतकऱ्याने सुरक्षित पकडून थेट खांद्यावर उचलत पोलीस ठाण्यात नेल्याची धक्कादायक आणि तितकीच अनोखी घटना समोर आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे
ही घटना बिहारच्या सप्पोर मधली आहे.
दिल्ली: धानाच्या शेतात काम सुरू असताना अचानक समोर मगर आली आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मात्र भीतीने मागे हटण्याऐवजी एका शेतकऱ्याने दाखवलेले धाडस आणि त्यानंतर घडलेली घटना आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
शेतात दिसलेल्या जवळपास पाच फूट लांबीच्या मगरीमुळे सुरुवातीला ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. अनेकांनी सुरक्षित अंतर राखले, तर काहींनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या मदतीने मगरीला कोणतीही इजा न पोहोचवता ताब्यात घेण्यात आले. सुरक्षिततेच्या दृष्टीने तिचे तोंड दोरीने बांधण्यात आले.
यानंतर शेतकरी अमित कुमार याने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत मगरीला थेट खांद्यावर उचलले आणि पोलीस ठाण्याकडे पायी प्रवास सुरू केला. रस्त्यावरून जाणारे नागरिक हा अनोखा देखावा पाहण्यासाठी थांबत होते. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले. काही मिनिटांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
अमित कुमार याने सांगितले की, तो धानाच्या शेतात काम करत असताना त्याला मगर दिसली. ग्रामस्थांच्या मदतीने तिला सुरक्षित पकडण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या कार्यालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तेथे कर्मचारी उपस्थित नसल्याने अखेर तो मगर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला.
पोलीस ठाण्यात शेतकरी खांद्यावर मगर घेऊन पोहोचताच उपस्थित पोलीस कर्मचारी काही काळ स्तब्ध झाले. त्यानंतर तातडीने वन विभागाला माहिती देण्यात आली. विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मगरीची तपासणी करण्यात आली.
वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसाळ्यात नद्या आणि जलस्रोतांमधील पाण्याची पातळी वाढल्याने अनेकदा जलचर प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाबाहेर येतात. त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वतःहून वन्यजीव पकडण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ वन विभागाला माहिती देणे अधिक सुरक्षित ठरते.
तपासणीनंतर मगरीला सुरक्षितपणे तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्याने दाखवलेल्या धाडसाची चर्चा सुरू असली, तरी वन्यजीवांच्या बाबतीत प्रशिक्षित पथकाची मदत घेणेच सर्वांत योग्य असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
