'सतलुज' चित्रपट ओटीटीवरून हटवल्यानंतरही टेलिग्रामवर त्याच्या पायरेटेड प्रती उपलब्ध असल्याने पुन्हा ऑनलाइन पायरेसीचा मुद्दा चर्चेत आला आहे. टेलिग्रामवरील बॉट, चॅनेल आणि कॉपीराइट उल्लंघनाचे संपूर्ण वास्तव जाणून घ्या.
नवी दिल्ली : वादाच्या पार्श्वभूमीवर 'सतलुज' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आला असला, तरी त्याच्या पायरेटेड प्रती टेलिग्रामवर सहज उपलब्ध होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे ऑनलाइन पायरेसीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा चित्रपटांच्या प्रती टेलिग्रामवर इतक्या वेगाने कशा पोहोचतात, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, टेलिग्राम स्वतः कोणताही चित्रपट अपलोड करत नाही. हे एक संदेशवहन व्यासपीठ असून, त्यावरील काही सुविधा आणि वैशिष्ट्यांचा गैरवापर करून पायरेसीचे जाळे उभे केले जाते. त्यामुळे नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच त्याच्या बेकायदेशीर प्रती विविध चॅनेल आणि गटांमध्ये प्रसारित होतात.
चित्रपटाची पायरेटेड प्रत तयार करण्यासाठी अनेक बेकायदेशीर मार्गांचा वापर केला जातो. एकदा ही प्रत इंटरनेटवर उपलब्ध झाली की ती विविध माध्यमांतून वेगाने पसरते. त्यानंतर टेलिग्रामवरील चॅनेल, गट आणि बॉटच्या माध्यमातून ती मोठ्या प्रमाणावर वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवली जाते.
अनेक सार्वजनिक टेलिग्राम चॅनेलवर चित्रपट थेट उपलब्ध करून दिला जात नाही. त्याऐवजी वापरकर्त्यांना एका बॉटकडे पाठवले जाते. हा बॉट काही विशिष्ट चॅनेलमध्ये सामील होण्याची अट घालतो. वापरकर्ता त्या चॅनेलमध्ये सहभागी झाल्यानंतर त्याला चित्रपटाची डाउनलोड लिंक किंवा व्हिडिओ फाइल उपलब्ध करून दिली जाते. या पद्धतीमुळे अशा चॅनेलची सदस्यसंख्या झपाट्याने वाढते.
दरम्यान, पायरेटेड चित्रपट आणि ओटीटीवरील कॉपीराइट संरक्षित सामग्रीच्या प्रसाराबाबत केंद्र सरकारने टेलिग्रामकडे स्पष्टीकरण मागितले असून, अशा सामग्रीविरोधात प्रभावी कारवाई करण्याबाबत नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात निश्चित कालावधीत उत्तर देण्यासही सांगण्यात आले आहे.
टेलिग्रामच्या धोरणानुसार, सार्वजनिक चॅनेल किंवा बॉटवर कॉपीराइटचे उल्लंघन झाल्याची वैध तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित सामग्रीवर कारवाई केली जाऊ शकते. मात्र खासगी गट आणि खासगी संवाद वेगळ्या पद्धतीने कार्यरत असल्यामुळे अशा प्रकारच्या पायरेटेड सामग्रीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक ठरत असल्याचे मानले जाते.
सायबर सुरक्षातज्ज्ञांच्या मते, अशा बेकायदेशीर लिंक किंवा बॉटद्वारे चित्रपट डाउनलोड करणे केवळ कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन नाही, तर वापरकर्त्यांसाठीही धोकादायक ठरू शकते. अनेक वेळा अशा लिंकद्वारे बनावट संकेतस्थळांवर नेले जाते, जिथे मालवेअर, फिशिंग आणि ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचा धोका असतो. त्यामुळे चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी अधिकृत ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा चित्रपटगृहांचाच वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
°°°°°