विज खांब हटवून मार्गाचे रुंदिकरण करा
आ. जोरगेवार यांची अधिकाऱ्यांसह संयुक्त बैठक
चंद्रपूर – शहरातील वाढता वाहतूक भार, ट्रॅफिकची समस्या, पाणीपुरवठ्याची गळती आणि रस्त्याच्या कडेला उभे असलेले वीज खांब यामुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणींचा विचार करून, रस्ता रुंदीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांची एकत्रित बैठक घेतली. त्यानंतर आ. किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांसह शहरातील मुख्य मार्गाची पाहणी केली
या बैठकीस महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग , वेकोली आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या विभागांचा समावेश होता. यावेळी मनपा आयुक्त विद्या गायकवाड, महावितरणचे अधीक्षक अभियंता चिवंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, मनपा शहर अभियंता रविंद्र हजारे, तसेच भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष छबू वैरागडे, संघटन महामंत्री नामदेव डाहुले, माजी महापौर राखी कंचार्लावार, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, माजी नगर सेवक संजय कंचार्लावार, करणसिंह बैस आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह शहरातील कस्तुरबा आणि महात्मा गांधी या दोन मुख्य मार्गांची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, २० कोटी रुपयांतून या दोन्ही मार्गांचे काम सुरू असून आता अंतिम टप्प्यात शेवटच्या आवरणाचे काम सुरू होणार आहे. मात्र, हे काम होत असताना रस्त्यावर असलेले अतिरिक्त विद्युत खांब काढून रस्ते रुंद करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत.
यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, रस्त्याकडेला उभे असलेले वीज खांब व गटारे यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना सतत धोका निर्माण होतो. म्हणूनच हे खांब तातडीने हलवून रस्ते प्रशस्त करावेत. अनेक ठिकाणी पाणी गळतीमुळे रस्त्यांचे नुकसान होत आहे आणि नागरिकांच्या घरासमोर चिखल व घाण साचते. संबंधित विभागांनी त्वरित तपासणी करून यांची दुरुस्ती करावी.
केवळ रस्ते बनवणे हे आपले उद्दिष्ट नाही, तर नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुखदायी प्रवासाचा अनुभव देणे हे आपले ध्येय आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वयाने काम करून गुणवत्तापूर्ण आणि वेळेत काम पूर्ण करावे, असेही जोरगेवार यांनी सांगितले. वेकोली अंतर्गत येणाऱ्या मार्गांचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आणि महावितरणने रस्त्यावर केलेले खोदकाम दुरुस्त करून उर्वरित काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
Joint meeting of Mla Jorgewar with officials
