‘जो आपला घात करेल, त्याचा घात करण्याची तयारी ठेवा’



आमदारकी गेली खड्ड्यात! विजय वड्डेटीवारांचा इशारा  


नागपूर : राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षण संघर्ष पुन्हा पेटला आहे. नागपूर येथे आज ओबीसी समाजाच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द करावा, अशी प्रमुख मागणी मोर्चेकरांनी केली. या मोर्चात 371 जातींचा सहभाग होता, तर दुसरीकडे मराठा समाज एकच जात असून त्यांना अधिक आरक्षण दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आला.


मोर्चात भाषण करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वड्डेटीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “आमदारकी गेली खड्ड्यात, वड्डेटीवार कसलीही परवा करणार नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो कोणी आपला घात करेल, त्याचा घात करण्याची तयारी ठेवा,” असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला.


वड्डेटीवार म्हणाले, “राज्यातील 15 टक्के लोकांचं सरकार आपल्यात भांडण लावण्याचं काम करतंय. 2 सप्टेंबरचा जीआर वाचल्यावर वाटतं, एका जरांगेच्या भरवशावर हे सरकार चालतंय काय? आमचा डीएनए ओबीसी आहे, पण जे स्वतःला ओबीसी म्हणवतात ते आज ओबीसींच्या गळ्यावर सुरी फिरवत आहेत.” त्यांनी सरकारला इशारा देत सांगितले की, “2 सप्टेंबरचा जीआर रद्द झाला नाही, तर आम्ही फक्त मुंबई नाही तर पुणे आणि ठाणेही जाम करू.”


वड्डेटीवार यांनी पुढे सांगितले की, “मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळत असेल, तर आम्हाला काही हरकत नाही. मात्र, ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी होऊ देणार नाही. हा मोर्चा केवळ झाकी आहे; पुढे मोठं आंदोलन उभं राहील. जर सरकारने हा जीआर रद्द केला नाही, तर आम्ही सरकारलाच थांबवू.”


केंद्राच्या आर्थिक दुर्बल घटक आरक्षणात 10 टक्क्यांपैकी साडेआठ टक्के मराठा समाजाला मिळतंय, असा आरोप वड्डेटीवारांनी केला. “4 हजार 300 नोंदी असताना 2 लाख 40 हजार प्रमाणपत्रं वाटली गेली आहेत. आता संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे थांबवलं नाही तर ओबीसींच्या हक्कांवर गदा येईल,” असं त्यांनी स्पष्ट केलं.


शेवटी वड्डेटीवार म्हणाले, “सरकारने धनगर समाजात फूट पाडली, ओबीसींमध्ये फूट पाडली. आता आरक्षण नको हीच ह्यांची विचारधारा आहे. पण ओबीसी समाज आता शांत बसणार नाही. आम्ही हक्कासाठी लढू आणि अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरू.”

OBC reservation controversy protest in Nagpur


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने