Google I/O 2026 मध्ये गुगलने जेमिनी 3.5 फ्लॅश, जेमिनी स्पार्क, एआय सर्च, XR ग्लासेस आणि स्मार्ट शॉपिंगसह अनेक अत्याधुनिक एआय फीचर्स लॉन्च केले.
नवी दिल्ली: अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी Google ने आपल्या वार्षिक Google I/O 2026 परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी नव्या एआय मॉडेल्स, स्मार्ट एजंट्स आणि भविष्यकालीन तंत्रज्ञान फीचर्सची माहिती दिली. या परिषदेत सादर करण्यात आलेले अनेक फीचर्स वापरकर्त्यांसाठी एखाद्या जादूसारखा अनुभव देणारे ठरणार असल्याची चर्चा तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू आहे.
गुगलने या कार्यक्रमात Gemini 3.5 Flash हे नवीन एआय मॉडेल सादर केले. कंपनीच्या दाव्यानुसार हे मॉडेल कोडिंग, मल्टिमोडल प्रोसेसिंग आणि एआय बेंचमार्कमध्ये आधीच्या Gemini 3.1 Pro पेक्षा अधिक वेगवान आणि सक्षम आहे. हे मॉडेल एजंटिक टास्क पूर्ण करण्यास सक्षम असून इतर फ्रंटियर एआय मॉडेल्सपेक्षा चार पट अधिक वेगाने काम करत असल्याचे सांगण्यात आले.
हे नवीन मॉडेल जेमिनी ॲप, गुगल सर्च, जेमिनी API आणि इतर सेवांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. तर Gemini 3.5 Pro सध्या टेस्टिंग टप्प्यात असून पुढील महिन्यात रोलआउट होणार आहे.
कार्यक्रमात Gemini Omni या नव्या एआय मॉडेल मालिकेचेही अनावरण करण्यात आले. हे प्लॅटफॉर्म टेक्स्ट, फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ इनपुटच्या आधारे पूर्ण व्हिडिओ तयार करू शकते. त्याचबरोबर रिअल वर्ल्ड नॉलेज सपोर्ट आणि स्मार्ट व्हिडिओ एडिटिंग फीचर्सही यात देण्यात आले आहेत. हे फीचर्स लवकरच YouTube Shorts, Google Flow आणि AI Plus वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहेत.
एआयने तयार केलेला कंटेंट ओळखणे सोपे व्हावे यासाठी गुगलने C2PA कंटेंट क्रेडेन्शियल सपोर्टही सादर केला आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना एखादी प्रतिमा किंवा कंटेंट खऱ्या कॅमेराने तयार झाला आहे की एआय टूल्सच्या मदतीने बदलण्यात आला आहे, हे सहज समजू शकणार आहे.
जेमिनी ॲपसाठी गुगलने Neural Expressive नावाची नवीन डिझाइन सिस्टीम सादर केली आहे. यामध्ये आकर्षक ॲनिमेशन, नवीन टायपोग्राफी, हॅप्टिक फीडबॅक आणि अधिक रंगीत इंटरफेस देण्यात आला आहे. याशिवाय जेमिनी लाईव्ह आता फुलस्क्रीन मोडमध्ये न उघडता थेट संवाद साधण्याची सुविधा देणार आहे.
गुगलने Gemini Spark नावाचा वैयक्तिक एआय एजंटही सादर केला आहे. हा एआय एजंट वापरकर्त्यांच्या वतीने विविध कामे करू शकणार आहे. Gmail, Docs आणि Google Workspace ॲप्ससोबत तो थेट इंटिग्रेट होणार आहे. अमेरिकेतील सबस्क्राइबर्ससाठी हे फीचर पुढील आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे.
कंपनीने Daily Brief नावाचे नवीन फीचरही लॉन्च केले आहे. हे फीचर Gmail, Calendar आणि Tasks स्कॅन करून वापरकर्त्याला दिवसभरातील वैयक्तिक अपडेट्स देणार आहे. एआय Plus, Pro आणि Ultra प्लॅनधारकांना याचा फायदा मिळणार आहे.
Google Search मधील AI Mode आता Gemini 3.5 Flash ने अधिक शक्तिशाली करण्यात आला आहे. नवीन इंटेलिजंट सर्च बॉक्स लांब आणि संवादात्मक प्रश्न अधिक अचूकपणे समजू शकणार आहे.
शॉपिंग अनुभव अधिक स्मार्ट करण्यासाठी गुगलने Universal Cart नावाचे एआय आधारित शॉपिंग हब लॉन्च केले आहे. यात प्राइस ड्रॉप, डील्स, स्टॉक अलर्ट आणि स्मार्ट खरेदी सूचना मिळणार आहेत.
याशिवाय गुगलने Android XR आधारित स्मार्ट ग्लासेसही सादर केले आहेत. हे ग्लासेस Samsung आणि Qualcomm यांच्या सहकार्याने तयार करण्यात आले असून ते Android आणि iPhone दोन्ही डिव्हाइससोबत काम करू शकतील. या ग्लासेसचे डिझाइन Gentle Monster आणि Warby Parker यांनी तयार केले आहे.
Android Halo नावाचे नवीन फीचरही सादर करण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना फोन न उघडता स्क्रीनच्या वरच्या भागात एआय एजंटची अॅक्टिव्हिटी आणि प्रगती पाहता येणार आहे.
Google I/O 2026 मधील या घोषणांमुळे एआय तंत्रज्ञान आता अधिक वैयक्तिक, स्मार्ट आणि दैनंदिन जीवनाशी जोडले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
°°°°°°