मिडल ईस्टमध्ये भीषण संघर्ष; इराणवर अमेरिका-इस्रायल संयुक्त हल्ले, ८७ विद्यार्थिनींचा मृत्यू, तणाव शिगेला

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर मिडल ईस्टमध्ये तणाव तीव्र झाला. ८७ विद्यार्थिनींचा मृत्यू, लष्करी ठिकाणांवर मिसाइल हल्ले आणि जागतिक राजकारणात खळबळ.

नवी दिल्ली : मिडल ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून इराण, इजरायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण पश्चिम आशिया अस्थिर झाला आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त लष्करी कारवाई करत व्यापक मिसाइल हल्ले केले. या हल्ल्यांनंतर इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून मिनाब शहरातील एका मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यात ८७ विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे.

इस्रायलने या मोहिमेला ‘शेर की दहाड़’ असे नाव दिले असून अमेरिकेने ‘Operation Epic Fury’ या नावाने ही कारवाई जाहीर केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईला ‘मेजर कॉम्बॅट ऑपरेशन’ संबोधत इराणच्या अणु कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या धोक्याचा अंत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी इराणी सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका करत अण्वस्त्र निर्मिती थांबवण्याचा इशारा दिला.

हल्ल्यांमध्ये तेहरान, कॉम, तबरेज, करमनशाह, कराज आणि इस्फहान या शहरांवर लक्ष्य साधण्यात आले. राजधानी तेहरानमध्ये सकाळच्या सुमारास झालेल्या स्फोटांनंतर आकाशात धुराचे मोठे लोट दिसून आले. इराणच्या संरक्षण मंत्रालय, राष्ट्रपती भवन, गुप्तचर मुख्यालय तसेच अणुऊर्जा कार्यालयांवरही हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनीयांच्या निवासस्थानाजवळही स्फोट झाल्याचे वृत्त आहे, मात्र ते सुरक्षित असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे आभार मानत ही कारवाई इराणकडून निर्माण झालेल्या अस्तित्वाच्या धोक्याविरुद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी इराणच्या अणु कार्यक्रमावर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

इराणने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत पश्चिम आशियातील सात देशांमध्ये असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर मिसाइल डागल्याचा दावा केला आहे. तसेच देशाचे हवाई क्षेत्र तात्काळ बंद करण्यात आले असून सर्व विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. इराणी संसद राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या अध्यक्षांनी इस्रायल आणि अमेरिकेला थेट इशारा देत ही लढाई त्यांनी सुरू केली असली तरी शेवट इराण करेल, असे म्हटले आहे.

या सघर्षामागे इराणचा अणु कार्यक्रम हा मुख्य मुद्दा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेकडून यापूर्वी इराणला युरेनियम संवर्धन थांबवणे, बॅलिस्टिक मिसाइल कार्यक्रम मर्यादित करणे आणि प्रॉक्सी गटांना पाठिंबा बंद करण्याबाबत अल्टिमेटम देण्यात आला होता. जिनिव्हामध्ये झालेल्या शांतता चर्चाही निष्फळ ठरल्याचे सांगितले जात आहे.

सध्या मिडल ईस्टमध्ये तणावाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून जागतिक समुदायाचे लक्ष या संघर्षाकडे लागले आहे. पुढील काही दिवसांत या युद्धजन्य परिस्थितीचे स्वरूप अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


_____




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने