व्हॅलेंटाईन डेचा वेगळा उपक्रम; स्नेह सावली केअर सेंटरमध्ये गीतांच्या माध्यमातून सेवाभावाला सलाम!

 

१४ फेब्रुवारी रोजी स्नेह सावली केअर सेंटरमध्ये ‘सिंग अलॉंग’ टीमकडून गीतांचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. व्हॅलेंटाईन डे निमित्त सेवाभावी कर्मचाऱ्यांना मानवतेच्या प्रेमाचा अनोखा सलाम करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर : व्हॅलेंटाईन डे म्हटले की प्रेमाची पारंपरिक अभिव्यक्ती डोळ्यांसमोर येते. मात्र १४ फेब्रुवारी रोजी स्नेह सावली केअर सेंटरमध्ये प्रेमाचा अर्थ वेगळ्याच पद्धतीने अनुभवायला मिळाला. येथे ‘सिंग अलॉंग’ टीमने सादर केलेला गीतांचा कार्यक्रम हा केवळ सांस्कृतिक उपक्रम नव्हता, तर सेवाभाव, आपुलकी आणि मानवतेच्या प्रेमाला दिलेला भावनिक सलाम ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात होताच वातावरणात संगीताचे सुर दरवळले आणि उपस्थित आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. अनेक जण तालावर डोलू लागले, तर काहींनी उत्स्फूर्तपणे नृत्य करत क्षणाचा आनंद लुटला. विशेष म्हणजे, एरव्ही हालचाल करणेही कठीण असलेल्या एका आजींनी “पंछी बनू उडती फिरू” या गाण्यावर उभे राहून नृत्य केले. हा क्षण पाहताना उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

श्यामराव नावाच्या एका ज्येष्ठ नागरिकांनी कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, इतका मनमोकळा, सहज आणि आपुलकीने रंगलेला कार्यक्रम त्यांनी यापूर्वी कधी अनुभवला नव्हता. संगीताच्या माध्यमातून निर्माण झालेली ही भावनिक जोड सर्वांनाच स्पर्शून गेली.

या कार्यक्रमाचे निवेदन डॉ. संध्या मोहिते यांनी केले. पुढील गाणे कोणते असेल याची पूर्वकल्पना नसताना प्रत्येक वेळी त्या प्रसंगानुरूप निवेदन करत होत्या. ऐन क्षणी गाण्याचा भाव ओळखून वातावरणाशी जोडून संवाद साधण्याचा हा अनुभव त्यांच्यासाठीही समृद्ध करणारा ठरल्याचे त्यांनी सांगितले.

हा उपक्रम विशेषतः स्नेह सावलीमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. दररोज आजारी, निराधार आणि अपंग व्यक्तींची सेवा करताना हे कर्मचारी प्रेमाचा खरा अर्थ जगत असतात. व्हॅलेंटाईन डे निमित्त त्यांच्या निस्वार्थ सेवेला कृतज्ञतेची सलामी देण्याचा हा प्रयत्न होता.

या कार्यक्रमामागे ‘सिंग अलॉंग कराओके क्लासेस’च्या संस्थापिका जया महाजन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्या संगीताच्या माध्यमातून सामाजिक संस्थांमध्ये आनंदाचे क्षण निर्माण करत आहेत. शास्त्रीय संगीताचे भक्कम शिक्षण आणि गुरुपरंपरेची परंपरा त्यांच्या सादरीकरणातून जाणवते. या कार्यात त्यांना पती संतोष महाजन तसेच रवी पवार यांचे सहकार्य लाभले.

जया महाजन यांनी विविध वृद्धाश्रम आणि केअर सेंटरमध्ये विनामूल्य संगीतसेवा देत सामाजिक जाणीवेचे उदाहरण घालून दिले आहे. स्नेह सावलीतील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हेच त्यांच्या कलेचे खरे यश असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

व्हॅलेंटाईन डे हा केवळ दोन व्यक्तींमधील प्रेमाचा दिवस नसून मानवतेच्या प्रेमाचा उत्सव आहे, हा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला. सेवाभाव, माया आणि सन्मानाने जगण्याचा हक्क यांची जाणीव करून देणारा हा उपक्रम शहरासाठी प्रेरणादायी ठरला.


—-------





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने