ऑनलाइन फसवणुकीत २२ हजार कोटींहून अधिक नुकसान

 


 वर्षभरात २५% तर पाच वर्षांत ८१४ टक्क्यांची वाढ 

देशात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींमध्ये पाच वर्षांत ८१४ टक्क्यांची वाढ झाली असून २०२५ मध्येच २२ हजार कोटींहून अधिक रकमेचे नुकसान झाले आहे. एनसीआरपीच्या आकडेवारीतून धक्कादायक चित्र समोर आले आहे.

मुंबई: देशभरात डिजिटल व्यवहारांची व्याप्ती वाढत असताना सायबर गुन्हेगारीचे जाळेही झपाट्याने विस्तारत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या एका वर्षात २५ टक्क्यांनी वाढ झाली असून मागील पाच वर्षांत तक्रारींची संख्या तब्बल ८१४ टक्क्यांनी वाढली आहे. २०२५ या वर्षातच नागरिकांनी सायबर फसवणुकीमुळे २२ हजार ४८५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम गमावल्याची अधिकृत नोंद आहे. 

आर्थिक फसवणूक झाल्यानंतर नागरिक राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवतात. उपलब्ध आकडेवारीनुसार २०२५ मध्ये देशभरातून २४ लाख २ हजार ५७९ तक्रारी दाखल झाल्या. याआधी २०२४ मध्ये १९ लाख १८ हजार ८३५ तक्रारींची नोंद झाली होती. केवळ एका वर्षात तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट होते. फसवणुकीची रक्कम २०२४ मध्ये २२ हजार ८४८ कोटी रुपये इतकी होती, तर २०२५ मध्ये ती २२ हजार ४८५ कोटी रुपयांवर नोंदवली गेली आहे.

मागील काही वर्षांतील आकडे पाहिल्यास परिस्थिती किती झपाट्याने बदलली आहे हे स्पष्ट होते. २०२१ मध्ये २ लाख ६२ हजार ८४६ तक्रारी आणि ५५१ कोटी रुपयांचे नुकसान नोंदले गेले होते. २०२२ मध्ये तक्रारी ६ लाख ९४ हजार ४४६ वर पोहोचल्या आणि नुकसान २ हजार २९० कोटींवर गेले. २०२३ मध्ये १३ लाख १० हजार ३५७ तक्रारींसह ७ हजार ४६५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर २०२४ आणि २०२५ मध्ये तक्रारींचा आकडा विक्रमी पातळीवर गेला.

डिजिटल पेमेंट, नेट बँकिंग, यूपीआय, क्रेडिट-डेबिट कार्ड व्यवहार तसेच विविध मोबाइल ॲप्सच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर सायबर गुन्हेगारांनी लक्ष केंद्रित केले आहे. बनावट लिंक पाठवणे, केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवे संदेश, बँक खाते बंद होण्याची भीती दाखवणारे कॉल, लॉटरी लागल्याचे आमिष अशा विविध युक्त्या वापरून नागरिकांची दिशाभूल केली जाते. अनेक प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत टोळ्यांचा सहभाग असल्याचेही तपासातून समोर आले आहे.

सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिमकार्ड्स आणि मोबाईल उपकरणांवर कारवाई करताना यंत्रणांनी १२ लाख २१ हजारांहून अधिक सिमकार्ड्स ब्लॉक केली आहेत. याशिवाय ३ लाख ३ हजार मोबाईल फोनच्या आयएमईआय क्रमांकांनाही बंद करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड्स खरेदी करून फसवणूक रॅकेट चालवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

सायबर गुन्ह्यांतून उकळलेली रक्कम विविध बँक खात्यांत वळवण्यासाठी ‘म्युअल’ खात्यांचा वापर केला जातो. तपास यंत्रणांनी अशा सुमारे २६ लाख खात्यांचा शोध घेतला असून त्यातील ९ हजार ५५ कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे. बँका आणि वित्तीय संस्थांच्या सहकार्याने संशयित व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२४ पासून आतापर्यंत २१ लाख ६५ हजार संशयितांचा डेटा सुरक्षायंत्रणांना उपलब्ध झाला आहे.

ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढत असताना नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, ओटीपी किंवा बँक तपशील कुणालाही न देणे, अधिकृत ॲप्स आणि संकेतस्थळांचा वापर करणे यांसारख्या खबरदारीच्या उपाययोजना काटेकोरपणे पाळल्यास सायबर फसवणूक टाळता येऊ शकते.


----------






Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने