मुंबई : गायक व संगीतकार पलाश मुच्छल आणि भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज स्मृती मानधना यांचे लग्न तात्पुरते पुढे ढकलल्यानंतर चाहत्यांमध्ये पुन्हा कुतूहल वाढले आहे. 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणारा विवाह कार्यक्रम स्मृतीच्या वडिलांच्या तब्येतीच्या कारणास्तव रद्द करण्यात आला होता. या घटनेनंतर काही दिवसांतच पलाशलादेखील आरोग्य समस्या उद्भवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सलग आलेल्या दोन वैयक्तिक संकटांमुळे विवाह रद्द होण्यामागे तणावाची कारणे वाढल्याचा अंदाज चाहत्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, लग्न रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावर दोघांनीही पूर्वी शेअर केलेल्या प्री-वेडिंग पोस्ट्स हटवल्याने नात्यात दुरावा आल्याच्या अफवांना उधाण आले. काही मनोरंजन माध्यमांनी नृत्यदिग्दर्शकांशी संबंधित गैरसमजांना जोड देत पलाशने स्मृतीला धोका दिल्याच्या बातम्याही प्रसिद्ध केल्या. मात्र या व्यक्तींनी थेट निवेदन देत आरोप फेटाळून लावले आणि चुकीच्या अफवांमुळे त्यांची प्रतिमा खराब केली जात असल्याची प्रतिक्रिया दिली.
या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर पलाश मुच्छल १ डिसेंबर रोजी मुंबई विमानतळावर सार्वजनिकरीत्या दिसले आणि हा लग्न रद्द झाल्यानंतरचा त्यांचा पहिला सार्वजनिक अपिअरन्स ठरला. त्याच वेळी चाहत्यांनी पुन्हा लग्नाबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. पलाशच्या आईने दिलेल्या निवेदनात “शादी जल्दी होगी” असे सांगत लग्न होणार असल्याचा सूचक आशावादी संदेश दिला. तरीही समारंभाची नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल या दोघांकडून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी लग्न होणार की नाही, केव्हा होणार किंवा या सर्व घटनांची खरी पार्श्वभूमी काय आहे, याबाबत अनिश्चितताच कायम आहे. सोशल मीडियावर चाहत्यांचे चर्चेचे वादंग सुरू असले तरी अधिकृत माहिती मिळेपर्यंत प्रतीक्षा करण्याचे आवाहन विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.
—------------
