भविष्यात पैसा ‘बिनकामाचा’; नोकरी पण ऑप्शनल!

 

 इलॉन मस्कची धक्कादायक भविष्यवाणी

नवी दिल्ली : जगातील सर्वांत श्रीमंत आणि टेस्ला - स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांनी भविष्यातील अर्थव्यवस्थेबाबत एक भूकंपजनक भाकीत केले आहे. पुढील 10 ते 20 वर्षांत AI आणि रोबोटिक्स इतके प्रगत होतील की जगातील बहुतेक कामे मशीन स्वतः करतील आणि मानवांनी काम करणे हे फक्त ‘इच्छेनुसार’ असणारा पर्याय राहील, असे ते म्हणाले. निखिल कामत यांच्या ‘पीपल बाय WTF’ या पॉडकास्टमध्ये सहभागी होताना मस्क यांनी चलनव्यवस्था, पैसा, ऊर्जा आणि नोकरी प्रणालीच्या भविष्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.

मस्क यांच्या मते, जेव्हा मशीन सर्व गरजा विनामूल्य किंवा अत्यल्प खर्चात मानवांना उपलब्ध करून देतील, तेव्हा सध्याचा पैसा, नोटा, बँक कार्ड्स यांचे महत्त्व जवळजवळ शून्य होईल. उत्पादनासाठी मानवी श्रम आणि संसाधनांची आवश्यकता संपुष्टात आल्याने ‘पैसा’ हा फक्त एक औपचारिक साधन राहील.

भविष्यातील अर्थव्यवस्थेबाबत ते म्हणाले की, ऊर्जा हीच खरी करंसी ठरेल. कारण उत्पादनाची आणि निर्मितीची खरी ताकद ऊर्जा असते. याच संदर्भात त्यांनी बिटकॉइनचा उल्लेख करत त्यामागील ‘एनर्जी-बेस्ड’ मॉडेल भविष्यकाळाशी सुसंगत असल्याचे सांगितले.

मस्क यांनी स्कॉटिश लेखक इयान बँक यांच्या ‘कल्चर सीरिज’चा दाखला देत ‘पोस्ट-स्कार्सिटी इकॉनॉमी’ची कल्पना मांडली जिथे काहीच कमी नसते, पैसा अस्तित्वात राहत नाही आणि तंत्रज्ञानामुळे प्रत्येक गरज सहज उपलब्ध होते. सोलर-पावर्ड AI आणि स्पेसमधून ऊर्जा मिळवणाऱ्या तंत्रज्ञानामुळे अशी दुनिया वास्तवात येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नोकऱ्यांबाबत बोलताना मस्क म्हणाले की, भविष्यात नोकरी करणे ही गरज नसून व्यक्तीची फक्त निवड असेल. मशीन बहुतांश कामे करतील आणि मानव फक्त आवड म्हणून काम करणे निवडतील अशी व्यवस्था विकसित होऊ शकते. मानवजात, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेबाबत मस्कच्या या भाकितांमुळे जगभरात चर्चेचा भडका उडाला आहे.



------




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने