स्पर्धा परीक्षार्थ्यांना मोठा दिलासा संपूर्ण वेळापत्रक
मुंबई: परीक्षार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सन 2026 मधील विविध भरती परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून या परिक्षांचे वेळापत्रक कधी प्रसिद्ध होणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. अखेर जाहीर झालेल्या वेळापत्रकामुळे अभ्यास करणाऱ्या परिक्षार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शासन सेवेतील विविध पदभरतीसाठी MPSC दरवर्षी विविध परीक्षा आयोजित करते. आयोगाने जाहीर केलेले 2026 चे वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळांवर __ mpsc.gov.in आणि mpsconline.gov.in___ पाहण्यासाठी उपलब्ध आहे, या संकेतस्थळांवर सर्व परीक्षांचे दिवस, महिने व संभाव्य परीक्षा कालावधी विस्तृत स्वरूपात दिलेला आहे.
प्रस्तावित वेळापत्रकानुसार 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या प्रमुख परीक्षांमध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2025, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2025, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) संयुक्त मुख्य परीक्षा 2025, महाराष्ट्र गट-क संयुक्त परीक्षा 2025 तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा यांचा समावेश आहे.
याशिवाय, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 2026, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) संयुक्त परीक्षा 2026 आणि महाराष्ट्र गट-क संयुक्त परीक्षा 2026 याही परीक्षा वर्षभरात आयोजित करण्यात येणार आहेत. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासाचे योग्य नियोजन करता येणार असून वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर परीक्षार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
---
