क्रिप्टो फसवणूक प्रकरण उद्योगपतीची थरारक कहाणी
मुंबई : क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली मोठा नफ्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल ९० लाख २० हजार रुपयांची लूट झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात ८ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत.
फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव राजेश बांभानिया (३५) असून त्यांची ओळख भावाच्या मित्रामार्फत या स्कॅमच्या मुख्य आरोपी ध्रुव मेहता याच्याशी झाली. स्वतःला विश्वासार्ह दाखवत मेहताने बांभानिया यांना सांगितले की USDP नावाच्या क्रिप्टो करन्सीचा वापर कपड्यांच्या व्यवहारात केला तर मोठा आणि जलद नफा मिळू शकतो. एक लाख रुपयांच्या USDP करन्सीसाठी ९० लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल, असे त्याने सांगून नफा मिळणार असल्याचे आमिष दाखवले.
नफ्याच्या आशेने बांभानिया यांनी गुंतवणूक मान्य केली. आरोपींनी त्यांना अंधेरी पूर्वमधील टिम्मी आर्केड येथे बोलावले. व्यवहाराच्या नावाखाली आरोपींनी बांभानिया यांच्याकडून सुरुवातीचे २० लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर USDP करन्सी पाठवल्याचा केवळ दिखावा केला आणि काही क्षणातच सर्व जण घटनास्थळावरून फरार झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बांभानिया यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मुख्य आरोपी ध्रुव मेहता याच्यासह अँथोनी, साहिल, मजद शेख, अजगर हुसेन, शेख रफाक, मनोज प्रजापती आणि मोहम्मद सीम खान अशा आठ जणांवर कलम ४२० सह इतर आर्थिक गुन्ह्यांचे कलम लावून गुन्हा दाखल केला आहे.
सध्या सर्व आरोपी फरार असून एमआयडीसी पोलिसांनी त्यांचा जोरदार शोध सुरू केला आहे. क्रिप्टो करन्सीच्या नावाने गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक वाढत असताना या घटनेने पुन्हा एकदा डिजिटल फ्रॉडच्या वाढत्या धोके अधोरेखित केले आहेत.
------------------------------------------
