सामान्य कर्जदारांसाठी बँकांचे गणित थक्क करणारे
आजच्या काळात कर्ज घेणे सामान्य झाले आहे. घर खरेदी असो, वाहन खरेदी असो किंवा अचानक उद्भवलेल्या खर्चासाठी आर्थिक मदत हवी असो, कर्जाशिवाय पर्याय राहत नाही. पण बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जांच्या व्याजदरांमध्ये मोठी तफावत दिसते. विशेषतः गृहकर्ज आणि पर्सनल लोन यांच्या व्याजदरातील फरक सर्वांत जास्त चर्चा होणारा विषय आहे. गृहकर्जाचा दर साधारण ७ ते ९ टक्क्यांच्या घरात दिसतो, तर याउलट पर्सनल लोनचा व्याजदर १० ते २५ टक्क्यांपर्यंत पोहोचतो. अनेकदा NBFC आणि इतर वित्तीय संस्थांकडून तर त्याहून अधिक व्याज आकारले जाते. कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी असल्यामुळे पर्सनल लोन सर्वाधिक लोकप्रिय असले तरी ते सर्वाधिक महागही ठरते.
यामागील मूळ कारण म्हणजे कर्जाचा प्रकार. गृहकर्ज आणि वाहन कर्ज हे सुरक्षित कर्जांच्या श्रेणीत मोडतात कारण त्यामागे मालमत्ता किंवा संपत्ती तारण ठेवलेली असते. ग्राहकांनी हप्ता फेडण्यास टाळाटाळ केल्यास बँकांना तारणाचा ताबा घेऊन लिलावाद्वारे वसुली करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे या कर्जात बँकेचा धोका कमी असतो आणि त्यानुसार व्याजदरही कमी ठेवला जातो. तर पर्सनल लोन हे पूर्णतः असुरक्षित कर्ज असते. त्यासाठी तारण देण्याची आवश्यकता नसते. केवळ आधार कार्ड, आयकर किंवा इतर कागदपत्रांच्या आधारेच मोठी रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. परंतु अशा कर्जांमध्ये परतफेडीचा धोका बँकांच्या दृष्टीनं जास्त असतो. अनेक ग्राहक नियोजित कालावधीत कर्जाची पूर्ण रक्कम उशिरा किंवा कधीच परत करत नाहीत. त्यामुळे जोखीम भरून काढण्यासाठी बँका पर्सनल लोनवर वार्षिक व्याजदर नेहमीच जास्त ठेवतात.
पर्सनल लोन ही अल्पमुदतीची सुविधा असल्याने हप्तेही मोठे असतात. ग्राहकांना परतफेडीसाठी कमी कालावधी मिळत असल्यामुळे मासिक हप्त्याचा ताण अधिक जाणवतो. उलट गृहकर्ज आणि वाहन कर्जाचा कालावधी मोठा असतो, ज्यामुळे हप्ते कमी पडतात आणि परतफेडीचा ताणही तुलनेने कमी जाणवतो. वसुलीच्या दृष्टीने पाहिल्यास गृहकर्ज व वाहन कर्जात बँकांकडे मालमत्तेचा कायदेशीर अधिकार राहत असल्याने कर्ज पुरवताना बँक अधिक निर्धास्त असते. मात्र पर्सनल लोनमध्ये अशा प्रकारचे बंधन नसल्याने बँकांना वसुलीचे अतिरिक्त खर्च, कायदेशीर प्रक्रिया आणि डिफॉल्टचा धोका हाताळावा लागतो. या सगळ्या आर्थिक जोखमीची भरपाई ग्राहकांकडून अधिक व्याजाच्या स्वरूपात घेतली जाते आणि त्यामुळे पर्सनल लोन सर्वात महाग पडते.
गृहकर्ज स्वस्त आणि पर्सनल लोन महाग असण्यामागे बँकांचे हे सरळ आर्थिक तत्त्व कार्यरत आहे — जितका धोका जास्त, तितका व्याजदर जास्त. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी त्याचा प्रकार, मुदत, तारण आणि व्याजदर यांची तुलना करून निर्णय घेतल्यास दीर्घकालीन आर्थिक भार कमी ठेवता येऊ शकतो.
----------------------------------------------------
