हिवाळा सुरू होताच सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि निमोनिया यांसारख्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे नेहमीच दिसून येते. तज्ज्ञांच्या मते थंड हवामान, बंद वातावरण, कमी वेंटिलेशन आणि घटती रोगप्रतिकारशक्ती यामुळे फुफ्फुसांवर ताण वाढतो आणि निमोनियाचा धोका अधिक गडद होतो. संशोधनाच्या निष्कर्षांवर आधारित माहितीवरून हिवाळ्यात हा आजार का वाढतो आणि कोणती काळजी घ्यावी याबाबत आरोग्यतज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे.
हिवाळ्यात सर्वात प्रथम परिणाम होतो तो फुफ्फुसांवर. खूप थंड हवा श्वासाद्वारे थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास फुफ्फुसांच्या ऊतकांवर दुष्परिणाम होतात आणि त्याठिकाणी इन्फेक्शन लवकर बसते. याशिवाय थंडीमुळे लोक खिडक्या-दारे बंद ठेवतात, घरात ताजी हवा येण्या-जाण्याचा मार्ग कमी होतो, त्यामुळे बंद वातावरणात व्हायरस अधिक सहज पसरतात.
तज्ज्ञ सांगतात की तापमान कमी झाल्यामुळे शरीराची इम्युनिटी मंदावते. त्यामुळे शरीर व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढण्याची क्षमता कमी होते. थंड आणि कोरडी हवा नाक-घशातील ओलावा कमी करते, ज्यामुळे सूक्ष्मजंतू शरीरात प्रवेश करण्यास अधिक सक्षम होतात. अस्थमा, सीओपीडी, हार्ट प्रॉब्लेम, डायबिटीज किंवा इतर जुनाट आजार असलेल्या व्यक्तींमध्ये हिवाळ्यात फुफ्फुसांवरील ताण आणखी वाढतो आणि त्यांना निमोनियाचा धोका दुप्पट होतो.
तज्ज्ञांच्या सूचनांनुसार योग्य काळजी घेतल्यास निमोनियाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. थंड हवा थेट नाकापर्यंत जाऊ नये म्हणून बाहेर पडताना मफलर किंवा मास्क वापरणे आवश्यक आहे. हातांची स्वच्छता पाळल्यास संक्रमणाचा वेग कमी होतो. घरात ताजी हवा फिरण्यासाठी खिडक्या वेळोवेळी उघडणे उपयुक्त ठरते. हिवाळ्यात लोक पाणी कमी पितात, त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होते; म्हणून भरपूर पाणी, सूप किंवा गरम पेयांचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच फळे, भाज्या, सुके मेवे आणि व्हिटॅमिन-C यांसारखे इम्युनिटी वाढवणारे अन्नपदार्थ नियमित घ्यावेत. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसांचे नुकसान जास्त असल्याने त्यांच्यात निमोनियाचा धोका अनेक पटींनी वाढतो.
तज्ज्ञांनी विशेष सूचना दिली आहे की बाळ, वृद्ध आणि आधीपासून आजारी व्यक्तींनी फ्लू आणि निमोनियाविरोधी लस घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच हिवाळ्यात हा आजार पटकन पसरतो, त्यामुळे आजारी व्यक्तींशी अनावश्यक संपर्क टाळणे उपयुक्त ठरते.
[ सूचना: ही माहिती संशोधन व तज्ज्ञांच्या मतांवर आधारित असून ती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणताही नवा उपचार, व्यायाम किंवा आहारपद्धती अवलंबण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.]
-------------------------
