नवी दिल्ली : लग्नाचा सोहळा म्हणजे आनंद, गाणी, नाच, आणि नव्या नात्यांची सुरुवात. सात फेरे संपले की साऱ्यांच्या नजरा नववधूकडे वळतात हळवी, ओल्या डोळ्यांनी माहेरला निरोप देण्याची वेळ जवळ आलेली असते. पण एका विवाहात हा क्षण पारच वेगळ्या वळणावर गेला.
सकाळची वेळ. अंगणात बाकं मांडलेली, घरात लगबग सुरू, नातेवाईक उभे ठाकलेले. नवरदेव सजून धजून तयार. पण पाठवणीचा शेला धरायला नववधूच पुढे आलीच नाही.
प्रथम वाटलं तयारी करत असेल, सख्या सोबत गप्पा मारत असेल…पण काही मिनिटांतच चर्चा सुरू झाली. “नवरदेव थांबलेत… कुणी पल्लवीला बोलवा जरा…”
काहीजण खोलीपाशी गेले, कोणी अंगणात पाहिले, कोणी घराच्या मागच्या बाजूस. पण नववधूचा पत्ता नव्हता! क्षणाक्षणाला चिंता वाढू लागली. घरातील स्त्रियांचे चेहरे फिके, पुरुषांच्या कपाळावर आठ्या. बारातीत आलेले नातेवाईकही बेचैन.
काही तास शोधाशोध सुरू राहिली. फोन, नातेवाईक, ओळखी सगळीकडे चौकशी. पण नववधू एखाद्या सावलीसारखी अदृश्य झाली होती. आणि मग चर्चेचे सूर बदलू लागले…“कुणासोबत गेली असेल का?” “कुणी तिला उचलून तर नेलं नाही ना?” “की आधीपासूनच काही नियोजन होतं…?”
तणावाने भरलेले तास सरले… आणि शेवटी नवरदेवाने कडू सत्य स्वीकारले वरात परत जाईल… पण नववधू शिवाय. शेवटची गाडी निघाली तेव्हा अंगणभर पसरलेली शांतता एखाद्या थंड वाऱ्यासारखी चिरत मनाला भिडत होती.
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील बंकी कस्ब्यात घडली असून, नववधू पल्लवी ही विदाईपूर्वीच रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली. लग्नातील सर्व विधी ज्यात सात फेरे आणि डान्स पूर्ण झाल्यानंतर तिचा मागमूसही लागला नाही. संशय व्यक्त केला जातो की ती एखाद्या प्रियकरासोबत निघून गेली असावी.
नवरदेव सुनील गौतम याने लग्नासाठी स्वतःची जमीन गहाण ठेवली होती. अखेर निराश होऊन त्याला नववधूशिवायच बारात परत वळवावी लागली. पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.
-------------------------------
