मेरठ : जागृती विहार एक्सटेन्शन परिसरात एका खासगी रुग्णालयातील धक्कादायक आणि बेफिकीर वैद्यकीय कारभाराचा प्रकार प्रकाशात आला आहे. अडीच वर्षांच्या मनराज सिंह या लहान मुलाच्या डोक्याला पडून गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. कपाळावरून रक्तस्राव होत असतानाही मुलाच्या जखमेवर डॉक्टरांनी टाके घालण्याऐवजी पाच रुपयांची फेविक्विक लावल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.
उपचारादरम्यान मुलगा वेदनांनी ओरडत असतानाही डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे पालकांचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी मुलगा घाबरलेला असल्याचे सांगून परिस्थिती सामान्य होईल, असा दिलासा दिला. मात्र वेदना वाढत गेल्यानंतर पालकांनी त्याला तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवले. तिथे मुलाच्या जखमेवर लावलेली फेविक्विक काढण्यासाठी तब्बल तीन तास शस्त्रक्रियेसारखी प्रक्रिया करावी लागली. योग्य वेळी उपचार मिळाल्याने मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे.
मनराजचे वडील सरदार जसपिंदर सिंह यांनी सांगितले की, मुलगा खेळताना टेबलाच्या कोपऱ्यावर आपटला आणि कपाळाला खोल जखम झाली. जवळच्या मेपल्स हाइट परिसरातील खासगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी कोणतीही योग्य वैद्यकीय प्रक्रिया न करता फेविक्विक वापरून जखम चिकटवली. डोळ्यांच्या अगदी वर असलेल्या जखमेवर लावलेली फेविक्विक जर मुलाच्या डोळ्यात गेली असती, तर गंभीर अपघात घडला असता, असा आरोपही पालकांनी केला आहे.
प्रकरण उघड झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक कटारिया यांनी घटनेची चौकशी सुरू केली असून तपासातून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट असून खासगी रुग्णालयांच्या निष्काळजीपणाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
—------------------------------------------
