पुणे : जिल्ह्यातून समोर आलेल्या एका महत्त्वाच्या न्यायनिर्णयाने समाजाला ठळक इशारा दिला आहे. वृद्ध आई–वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलाला न्यायालयाने तीन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड उठावला आहे ठोठावला आहे. या निकालातून स्पष्ट संदेश दिला आहे की, पालकांची सेवा ही पर्याय नव्हे, तर कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे.
जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे राहणारे 80 वर्षीय विठ्ठल बाबुराव गाडगे यांनी आपल्या दोन्ही मुलांवर नारायणगाव पोलिसात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, सप्टेंबर 2022 पासून मे 2025 पर्यंत दोन्ही मुलं त्यांच्या घरात राहत असूनही अन्न, औषधोपचार, दैनंदिन देखभाल अशा कोणत्याही जबाबदाऱ्या ते पार पाडत नव्हते. स्वतःच्या आई–वडिलांकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. वृद्ध दांपत्याला आपल्या घरातच परक्यांप्रमाणे वागणूक मिळत होती, अशी वेदनादायी माहितीही यात नमूद होती.
या तक्रारीनंतर ज्येष्ठ नागरिक व पालकांचे संरक्षण व कल्याण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार एस.एम. कोकणे यांनी काटेकोरपणे पूर्ण केला आणि दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सर्व पुराव्यांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनंत बाजड यांनी आरोपी लक्ष्मण विठ्ठल गाडगे यांना दोषी ठरवले आणि तीन महिन्यांचा सश्रम कारावास तसेच पाच हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली.
या निर्णयामुळे वृद्धांचे हक्क आणि त्यांच्या सन्मानाचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. समाजातही या निकालाची व्यापक चर्चा होत असून, “पालकांचा सांभाळ हा पर्याय नसून प्रत्येक मुलाने पार पाडावयाचे कर्तव्यच आहे,” असा संदेश या प्रकरणातून अधोरेखित झाला आहे.
------–-----------------------------
