मालेगाव : अल्पवयीन मुलीवर निर्घृण अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केलेल्या घटनेनंतर राज्यभरात संताप उसळला आहे. या गुन्ह्याला सर्व स्तरातून तीव्र निषेध होत असताना मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी आज पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत अल्टिमेटम देत म्हटलं की दोन महिन्यांच्या आत कायद्यात बदल करून आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अन्यथा त्याचा एन्काऊंटर करा. लाडकी लेक आणि लाडकी बहीण म्हणवत असाल तर त्या कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा तुमचे तोंड काळे करा अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
पीडितेच्या वडिलांनी आपली वेदना व्यक्त करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि सरकारला उद्देशून सांगितले की, येत्या कॅबिनेट बैठकीत तातडीने कायद्यात दुरुस्ती करा, बाल लैंगिक अत्याचार कायद्यात बदल करा आणि पीडितेच्या नावाने कठोर कायदा तयार करा.
या प्रकरणात नामांकित वकील उज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणीही त्यांनी केली. महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करून आरोपीला फाशी द्याच, अन्यथा सरकार निर्दयी ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. मालेगाव आणि नाशिकपुरतेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पीडित कुटुंबाने सरकारला दहा दिवसांची मुदत दिली असून अकराव्या दिवशी न्याय न मिळाल्यास ते रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले. जरांगे पाटील यांनीही कुटुंबीयांशी चर्चा करून केलेल्या काही मागण्या लिखित स्वरूपात नोंदवल्या असून त्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्याचे सांगितले. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ते कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणामुळे राज्यात कायदेशीर सुधारणा आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू झाली असून जनतेत तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
---------------------------------
